aus vs sa ODI : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. आज पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत असल्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष टीम इंडियाच्या सामन्याकडे आहे. पण, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या एका कॅचने अवघ्या क्रिकेट विश्वाला आकर्षित केल्याचे दिसते.  नेथन ॲलिसच्या गोलंदाजीवर मार्को जान्सेनने सीमेपार चेंडू पाठवण्याचा प्रयत्न केला. पण, ऑस्ट्रेलियन खेळाडू सीन अबॉटने अविश्वसनीय झेल घेऊन फलंदाजालाही थक्क केले. सीन अबॉटचा अद्भुत झेल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 
अविश्वसनीय झेल...! 
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिकेच्या फलंदाजांनी सांघिक खेळी करत निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३३८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने सर्वाधिक (१०२) धावांची शतकी खेळी केली. तर, क्विंटन डी कॉक (८२), टेम्बा बवुमा (५७), रेजा हेन्ड्रिक्स (३९) आणि मार्को जान्सेनने (३२) धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर मार्कस स्टॉयनिस, नेथन ॲलिस आणि तन्वीर सांघा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 
मार्करमचे झंझावाती शतक
नाणेफेक गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना कांगारूच्या गोलंदाजांवर चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून हल्ला चढवला. सुरूवातीला क्विंटन डी कॉक मग एडन मार्करमने जबरदस्त खेळी केली. मार्करमने चार षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी केली.