Imran Khan Health Update: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार इमरान खान सध्या तुरुंगात असून, त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर इमरान खान यांच्या मदतीसाठी जगभरातील दिग्गज क्रिकेटर्स पुढे सरसावले आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्यासह एकूण 14 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला ईमेलद्वारे पत्र पाठवत इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
2023 पासून इमरान खान तुरुंगात
पाकिस्तानला 1992 मध्ये विश्वचषक जिंकून देणारे इमरान खान केवळ क्रिकेटपटूच नव्हे, तर देशाचे पंतप्रधानही राहिले आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते 2023 पासून तुरुंगात आहेत. त्यांना लाहोरमधून अटक करण्यात आली होती, तर सध्या ते रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात कैद आहेत. विविध प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
पत्रात नेमकं काय म्हटले ?
14 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पाठवलेल्या पत्रात इमरान खान यांच्या योगदानाची आठवण करून दिली आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, इमरान खान हे केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. न्याय्य खेळ, सन्मान आणि आदर या मूल्यांवर विश्वास ठेवणारे सहकारी क्रिकेटपटू म्हणून आम्हाला वाटते की, इमरान खान यांच्यासारख्या व्यक्तीला त्यांच्या दर्जाला साजेसा सन्मान आणि मूलभूत मानवी वागणूक मिळायला हवी.
माजी कर्णधारांच्या तीन प्रमुख मागण्या
यासोबतच, इमरान खान यांच्या प्रकृतीत झालेल्या घसरणीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय उपचार देण्याची मागणी करण्यात आली आहे. कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारपुढे तीन ठोस मागण्या मांडल्या आहेत...
पहिली मागणी : इमरान खान यांना तातडीने आणि सातत्याने उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत. त्यांना त्यांच्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्याची परवानगी द्यावी.
दुसरी मागणी : आंतरराष्ट्रीय मानकांनुसार त्यांना मानवी आणि सन्मानजनक कैद देण्यात यावी. तसेच कुटुंबीय आणि मित्रांना भेटण्याची मुभा द्यावी.
तिसरी मागणी : इमरान खान यांना निष्पक्ष, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने कायदेशीर लढा लढण्याची संधी मिळावी.
कोणकोणते दिग्गज पुढे आले?
या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या माजी कर्णधारांमध्ये सुनील गावस्कर, कपिल देव, मायकेल एथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल बेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, किम ह्यूजेस, नासिर हुसैन, क्लाइव्ह लॉयड आणि स्टीव्ह वॉ यांसारख्या जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांचा समावेश आहे.