India masters vs West Indies Masters Final : क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघानं इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी 20 स्पर्धेत 'ब्लॉकबस्टर' शो पाहायला मिळाला. रविवारी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेलेल्या फायनल लढतीत भारतीय संघाने लाराच्या नेतृत्वाखालील कॅरेबियन संघाला ६ विकेट्सने पराभूत करत यंदाचा हंगाम गाजवला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर दिग्गजांनी बहरलेल्या सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानंही 'चॅम्पियन'चा रुबाब दाखवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा एकदा पाहायला मिळाली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रेझ
सचिन तेंडुलकर विरुद्ध ब्रायन लारा या दोन दिग्गजांच्या संघात रंगलेला फायनल सामना पाहण्यासाठी रायपूरच्या मैदानात तुफान गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. ५२ वर्षी सचिन तेंडुलकरची क्रेझ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. त्याची झलक पाहण्यासाठी जवळपास ५० हजार चाहत्यांनी स्टेडियमवर उपस्थिती लावली होती. सचिनला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. पण १८ चेंडूतील २५ धावांच्या खेळीत त्याच्या भात्यातून निघालेले दोन खणखणीत चौकार आणि एक षटकार चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आणि त्याचे जुने तेवर दाखवणारे असेच होते.
लाराचा फ्लॉप शो! अंबाती रायडूचा जलवा
फायनल लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट ड्वेन स्मिथ आणि ब्रायन लारा या जोडीनं वेस्ट इंडिज मास्टर्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पण लाराला काही आपल्या भात्यातील तो जुना तोरा दाखवता आला नाही. अवघ्या ६ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. सलामीवीर ड्वेन स्मिथनं केलेली ४५ धावांची खेळी आणि लेन्डल सिमन्स याने ४१ चेंडूत केलेल्या ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर कॅरेबियन संघानं निर्धारित २० षटकात १४८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अंबाती रायडूनं जलवा दाखवला. भारताच्या डावाची सुरुवात करताना त्याच्या भात्यातून ५० चेंडूत ७४ धावांची खेळी पाहायला मिळाली. त्याने आपल्या या दमदार खेळीत ९ चौकारांसह ३ उत्तुंग षटकारही मारले. युवराज सिंग नाबाद १३ धावा आणि स्टुअर्ट बिन्नीनं नाबाद १५ धावा करत इंडिया मास्टर्स संघाला ६ विकेट्स आणि १७ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.
इंडिया मास्टर्सकडून गोलंदाजीत या दोघांनी केली हवा
भारतीय संघाच्या गोलंदाजीत विनय कुमारसह शाहबाज नदीम चमकला. विजयन कुमारनं भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या नावे करत कॅरिबयन फलंदाजीला सुरुंग लावला. दुसरीकडे शाहबाजनं ४ षटकात १२ धावा खर्च करत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या दोघांशिवाय नेगी आणि बिन्नी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.