पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ६८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा दक्षिण आफ्रिकेने सहजपणे पाठलाग केला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच पाकिस्तानच्या झालेल्या पराभवामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेने सुमारे १८ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. तसेच आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५ ते २०२७ च्या फेरीमधील दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याक पाकिस्तानने ९३ धावांनी विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला आहे. लाहोर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या विजयाच्या जोरावर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. मात्र आजच्या पराभवामुळे पाकिस्तानची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या खात्यात आता दोन सामन्यांमधून एक विजय आणि एका पराभवासह एकूण ५० टक्के गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यातही ५० टक्के गुण आहेत. मात्र सरस सरासरीच्या जोरावर त्यांनी चौथं स्थान पटकावलं आहे.
मात्र दक्षिण आफ्रिकेने आज मिळवलेल्या विजयाचा खरा फायदा हा भारतीय संघाला झाला आहे. भारतीय संघ आता आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाच्या खात्यात ७ सामन्यातून चार विजयांसह ६१.९० टक्के गुण आहेत. तर या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानी आहे.