Join us  

ICC World Test Championship : न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण?

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी जागतिक कसोट अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:34 PM

Open in App

मुंबई, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी जागतिक कसोट अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही स्पर्धा पुढील दोन वर्ष चालणार आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक कसोटी मालिका या स्पर्धेंतर्गत येणार आहेत. अॅशेस कसोटी मालिकेने या स्पर्धेचा श्रीगणेशा केला आणि ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत पहिल्या विजयाचा मान पटकावला. आतापर्यंत विजयी संघाच्या पंक्तित इंग्लंड, श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंड यांनी स्थान पटकावले आहे. पण, रविवारी न्यूझीलंडने मिळवलेला विजय हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं टेंशन वाढवणारा ठरला आहे.  2 वर्ष चालणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईल आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल. भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी यांना या विजयाचे श्रेय जाते. हा विजय मिळवून भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 60 गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सध्याची गुणतालिका पाहता भारतासह श्रीलंका आणि न्यूझीलंड हेही प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानी आहेत. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक डाव व 65 धावांनी विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या कामगिरीसह किवींनी खात्यात 60 गुण जमा केले. त्यामुळे आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, श्रीलंका व न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी 60 गुण झाले आहेत. पण, केवळ एका सामन्यात भारताने 60 गुण कमावल्यानं ते अव्वल स्थानी आहेत. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याची संधी आहे. या सामन्यात विंडीजने विजय मिळवल्यास भारत अव्वल स्थान गमावू शकतो. कारण, न्यूझीलंडने डावाने कसोटी सामना जिंकला आहे आणि टीम इंडिया पराभूत झाल्यास ते अव्वल स्थानी विराजमान होऊ शकतात.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतश्रीलंकान्यूझीलंडआॅस्ट्रेलियाइंग्लंड