Join us  

ICC World Cup 2019 : याआधीही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना दोन दिवस रंगला होता; जाणून घ्या तेव्हा कोण जिंकलं होतं

ICC World Cup 2019: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 10:33 AM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. भुवनेश्वर कुमार आजच्या खेळाची सुरुवात करेल. आज पावसाची शक्यता कमी असल्याने पूर्ण सामना होण्याची शक्यता आहे.   

भारतासोबत हे प्रथमच घडलेले नाही. यापूर्वीही 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सामना राखीव दिवशी खेळावा लागला होता. भारत आणि इंग्लंड असा तो सामना होता आणि तो बर्मिंगहॅमच्या एडबॅस्टन मैदानावर खेळवण्यात आला होता. हा सामना 29 मे रोजी सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात भारतीय संघाने 63 धावांनी विजय मिळवला होता.

त्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार अॅलेक स्टीव्हर्टनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून राहुल द्रविड ( 53) आणि सौरव गांगुली ( 40) यांनी दमदार खेळ करताना संघाला 50 षटकांत 232 धावा उभ्या करून दिल्या. त्यानंतर देबाशीस मोहंतीनं इंग्लंडला दोन धक्के दिले आणि गांगुलीनेही एक विकेट घेतली. 20.3 षटकांचा सामना झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि सामना थांबवण्यात आला. त्यावेळी इंग्लंडच्या 3 बाद 73 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 45.2 षटकांत 169 धावांत माघारी परतला. इंग्लंडकडून ग्राहम थॉर्पने सर्वाधिक 36 धावा केल्या. गांगुलीनं 8 षटकांत 27 धावांत तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय जवागल श्रीनाथ ( 2/25), अनिल कुंबळे ( 2/30) आणि मोहंती ( 2/54) यांनी सुरेख गोलंदाजी केली. गांगुलीला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंडइंग्लंडराहूल द्रविडसौरभ गांगुली