Join us  

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला.

By स्वदेश घाणेकर | Published: June 24, 2019 9:02 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारतन्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. त्यात रविवारी पाकिस्तानने उत्तम सांघिक कामगिरी करून दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. या पराभवाबरोबरच आफ्रिकेचे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग संपला. अफगाणिस्तान आणि आफ्रिका हे दोन संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे उर्वरित सहा संघांमध्ये अव्वल चार जागांसाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे धक्कादायक तसेच अनपेक्षित निकाल पाहायला मिळतील, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.

दक्षिण आफ्रिकेला 7 सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला, तर पाच सामन्यांत त्यांनी पराभवाची चव चाखली. इंग्लंड, बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला, तर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सात सामन्यांती त्यांच्या खात्यात केवळ 3 गुण जमा झाले आहेत. उर्वरित दोन सामन्यांत त्यांना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही सामने जिंकूनही त्यांचे 7 गुण होतील, त्यामुळे त्यांचे आव्हान संपलेच आहे.

अफगाणिस्तान संघाने मागच्या लढतीत भारतीय संघाला कडवी झुंज दिली खरी, परंतु त्यांना सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवूनही त्यांना फार फायदा होण्यातला नाही. पण, बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना धक्का देण्याची भूमिका ते बजावू शकतात.

वेस्ट इंडिजने मागच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय खेचूनच आणला होता. किवींचे नशीब बलवत्तर म्हणून कार्लोस ब्रॅथवेट बाद झाला आणि विंडीजला पराभव पत्करावा लागला. सहा सामन्यानंतर विंडीजच्या खात्यात 1 विजय, 4 पराभव व 1 अनिर्णीत निकालासह तीन गुण आहेत. उर्वरित तीन सामन्यांत त्यांना भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. सध्यस्थितीत भारत हाच त्यांच्यासमोर मोठा अडथळा आहे आणि तो त्यांनी यशस्वीरित्या पार केल्यास त्यांना पुढील सामने जिंकणे कठीण नाही. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तीनही सामने जिंकावेच लागतील.

दक्षिण आफ्रिकेला नमवून पाकिस्तानने स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राखले आहे. सहा सामन्यानंतर त्यांची गुणसंख्या 5 आहे. उर्वरित तीन सामन्यांत त्यांना न्यूझीलंड, बांगलादेश व अफगाणिस्तानचा मुकाबला करायचा आहे. या सामन्यांत धक्कादायक निकाल नोंदवल्यास ते 11 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकतात.

बांगलादेशचा इतिहास घडवण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सर्वात अऩप्रेडिक्टेबल संघ म्हणून बांगलादेशचं नाव घ्यायला हरकत नाही. सातत्याने प्रगती करत राहण्याची वृत्तीने त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत आशियातील सर्वोत्तम संघात दुसरे स्थान मिळवून दिले आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांचाही त्यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. सहा सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 5 गुण आहेत आणि त्यांना पुढील सामन्यांत अफगाणिस्तान, भारत व पाकिस्तान यांचा मुकाबला करायचा आहे.

यजमान इंग्लंडला दिलेल्या धक्क्यानंतर श्रीलंकेकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका या संघाला बसला. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले. चार सामन्यांत त्यांनी प्रत्येकी 2 जय-पराजय स्वीकारले. त्यामुळे सहा गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची पुढील वाटचाल सोपी नक्की नाही. त्यांना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांचा सामना करायचा आहे. इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीची पुनरावृत्तीच या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देऊ शकते.

न्यूझीलंड आणि भारत हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत त्यांचे स्थान जवळपास निश्चितच आहे. ऑस्ट्रेलियाही 10 गुणांच्या कमाईसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के करूनच आहे. यजमान इंग्लंड चौथ्या स्थानावर आहेत आणि दोन पराभवांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात उर्वरित तीन सामन्यांत त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचे आव्हान आहे. अशात एक चूक त्यांना महागात पडू शकते. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019न्यूझीलंडआॅस्ट्रेलियाभारतइंग्लंडश्रीलंकापाकिस्तानवेस्ट इंडिजअफगाणिस्तानद. आफ्रिकाबांगलादेश