लंडन - सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर विश्वचषक स्पर्धेत आज भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत जिगरबाज शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माच्या कामगिरीकडे आज सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेष बाब म्हणजे या लढतीत अनेक विक्रम मोडण्याची संधी रोहित शर्माकडे असून, आजच्या लढतीत 20 धावा काढल्यास रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा फटकावणारा फलंदाज ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माने नाबाद 122 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्येही रोहितकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी नेहमीच दमदार झाली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी रोहित शर्माला केवळ 20 धावांची गरज आहे. त्यामुळे आज रोहितने 20 धावा फटकावल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावणाऱ्या सचिन तेंडुलकर, व्हीव रिचर्डस आणि डेसमंड हेन्स या मोजक्या फलंदाजांच्या क्लबमघ्ये दाखल होईल.
![]()
विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर होईल. आतापर्यंत व्हीव रिचर्ड्स यांनी 45 डावांत, सचिन तेंडुलकरने 51 डावांत आणि डेसमंड हेन्स यांनी 59 डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावल्या आहेत. मात्र रोहित शर्माने आतापर्यंत केवळ 37 डावांमध्येच 61.87 च्या जबरदस्त सरासरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 धावा फटकावल्या आहेत. त्यात सात शतके आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियाविरुद्घ सर्वात वेगवान दोन हजार धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकर आणि व्हीव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडण्याची संधी रोहित शर्माकडे असेल.