मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे.
दुखापतग्रस्त धवनला भारतामध्ये पाठवण्यात येणार नाही. धवन हा संघाबरोबर इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याचबरोबर धवनचा पर्यायी खेळाडू तुर्तास तरी निवडण्यात येणार नाही. बीसीसीआयने एक ट्विट केले असून याबाबतची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार धवनची दुखापत गंभीर असून वर्ल्ड कप स्पर्धेतून तो माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला इंग्लंडसाठी रवाना होण्यास सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
''धवनच्या दुखापतीचा अंतिम अहवाल हाती आल्यानंतर संघ व्यवस्थापन त्याच्या बदलीची विनंती आयोजकांकडे करणार आहे. धवनला बदली खेळाडू म्हणून पंतला बोलावण्यात येणार आहे. धवनची दुखापत ही गंभीर आहे,'' अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिली आहे.
![]()
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम 15 जणांचा संघ जाहीर करताना निवड समितीनं पंतकडे दुर्लक्ष केले. त्याचे नाव चर्चेत असताना समितीनं अनुभवी दिनेश कार्तिकला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले. पण, आता धवनच्या दुखापतीमुळे पंतचे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे दार उघडे झाले आहे. त्यामुळे पुढील 48 तासात तो लंडनसाठी रवाना होऊ शकतो.
पाकिस्तानविरुद्ध पंत खेळणार?
गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंत खेळण्याची शक्यता कमीच आहे, परंतु पाकिस्तानविरुद्ध तो मैदानावर उतरू शकतो. पाकविरुद्ध लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे सलामीची जबाबदीर सांभाळतील, तर पंत चौथ्या क्रमांकावर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
धनवच्या दुखापतीने भारतासमोर अडचणींचे 'शिखर'
धवनच्या जागी रीषभ पंतला संधी द्या, सुनील गावस्कर यांचे मत
धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर