ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. महेंद्रसिंग धोनीनंही हात धुऊन घेतले. त्यानं 14 चेंडूंत 27 धावा केल्या. पण त्यानं मारलेल्या एका षटकारावर कोहलीनं दिलेली रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे.