ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळेल, याची सर्वांना खात्री होती. पण, नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.