Join us

ICC Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी भिडणार; जाणून घ्या कधी व कुठे रंगणार सामना

ICC Women's T20 World Cup: विश्वचषकाचा पहिल्या सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 20:07 IST

Open in App

ICC Women's T20 World Cup: भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचा दूसरा उपांत्य फेरीचा सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 5 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे महिला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे.

विश्वचषकाचा पहिल्या सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केले होते. यानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना देखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार असल्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलिया विजय मिळवत बदला घेणार की भारत आपले वर्चस्व पुन्हा गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्चला भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता मेलबर्न या मैदानात होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. गटातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडला बसलेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोटातही तशीच धाकधुक होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामन्यातही पावसानं खोडा घातला असता तर ऑस्ट्रेलियालाही गाशा गुंडाळावा लागला असता. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि कांगारुंचा जीव भांड्यात पडला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकं खेळून काढल्यानंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे ऑसींची कोंडी झाली. मात्र पाऊस थांबल्यानंतर दक्षिण अफ्रिकेसमोर डकवर्थ लुईसनूसार  13 षटकांत 98 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र दक्षिण अफ्रिकेला 13 षटकांत 5 बाद 92 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्या नावावर सर्वाधिक ४ जेतेपद आहेत. तसेच भारत पहिल्यांदाच विश्वचषकावर मोहर उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलिया