Join us

ऋषभ पंतची सहाव्या स्थानी झेप, कसोटी क्रमवारीत यशस्वी चौथा

ICC Test Ranking: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 06:15 IST

Open in App

दुबई - भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. 

पंतने मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत झुंजार अर्धशतक झळकावले. मात्र, त्याचा एकट्याचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला. जैस्वालला एका स्थानाचा फटका बसला असून इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने त्याला एका स्थानाने मागे खेचत तिसरे स्थान पटकावले. इंग्लंडचा जो रुट आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन अनुक्रमे पहिल्या दोन स्थानी कायम आहेत. शुभमन गिल याने चार स्थानांनी प्रगती करत १६वे स्थान पटकावले. त्याचवेळी, विराट कोहलीला आठ स्थानांचा फटका बसला असून तो २२व्या स्थानी घसरला आहे. कर्णधार रोहित शर्मा दोन स्थानांनी २६व्या क्रमांकावर घसरला आहे.

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने आपले तिसरे स्थान कायम राखले असून दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा अव्वल, तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलअवूड दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने चौथे स्थान पटकावताना रविचंद्रन अश्विनला पाचव्या स्थानी खेचले आहे. रवींद्र जडेजाने दोन स्थानांनी प्रगती करताना सहावे स्थान पटकावले. 

जडेजा अव्वल स्थानी अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने अव्वल स्थान कायम राखले असून, रविचंद्रन अश्विनने आपले दुसरे स्थानही कायम राखले आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या, तर वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या अक्षर पटेलची एका स्थानाने आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

टॅग्स :रिषभ पंतआयसीसीभारतीय क्रिकेट संघ