IND vs USA, ICC T20 World Cup 2026 : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात USA विरुद्धच्या सलामीच्या लढतीत सर्व फलंदाजांनी नांगी टाकली. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना बालेकिल्ल्यात सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. त्याने शेवटपर्यंत मैदानात थांबून ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने केलेल्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात १६१ धावांपर्यंत मजल मारली. आता विजयी सलामी देण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने गमावल्या चार विकेट्स! दोघांच्या पदरी भोपळा
USA विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या ४६ धावांवर पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या चार विकेट्स गमावल्या, ईशान किशन याने १६ चेंडूत केलेल्या २० धावा आणि तिलक वर्मानं १६ चेंडूत २५ धावा करून तंबूचा रस्ता धरला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे या दोघांवर 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली.
टीम इंडियाकडून सूर्या एकटा लढला! USA कडून सौरभ नेत्रावळक एकटा महागडा ठरला
अमेरिकन गोलंदाज ठराविक अंतराने धक्क्यावर धक्के देत असताना सूर्यकुमार यादवनं आपल्या घरच्या मैदानात आपला क्लास दाखवत शेवटपर्यंत मैदानात तग धरुन भारताच्या धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या उभारणारी खेळी केली. सूर्यकुमार यादवची लढवय्या खेळी वगळता फलंदाजीत एकाचाही निभाव लागला नाही. ईशान किशन २० (१६), तिलक वर्मा २५ (१६) आणि अक्षर पटेल १४ (११) वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. USA च्या संघाकडून शॅडली वॅन शॉकविक याने ४ षटकात २५ धावा करत ४ विकेट्स घेत जलवा दाखवला. त्याच्याशिवाय हरमीत सिंग याने ४ षटकात २६ धावा खर्च करत २ तर अली खान याने २ षटकात १३ धावा खर्च करत एक विकेट घेतली. सौरभ नेत्रावळकर हा USA चा सर्वात महगडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात एकही विकेट न घेता ६५ धावा खर्च केल्या.य