आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज होणाऱ्या सर्वात हाय होल्टेज लढतीत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. या लढतीत दणदणीत विजय मिळवून वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध जिंकण्याची परंपरा कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल. मात्र श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमधील रणसिंगे प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्यात खराब हवामानाचा अडथळा येण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर काय होणार, या लढतीसाठी राखीव दिवस आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी लढतींसाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आज भारत आणि पाकिस्तानमधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.
कोलंबोमधील आजच्या हवामानाबाबत अॅक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार आज १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान हे ३१ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. तर किमान तापमान हे २३ डिग्री सेल्सियस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता २६ टक्के आहे. तसेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता १०० टक्के आहे. त्यामुळे दिवसभर सूर्य दिसण्याची शक्यता कमी आहे. संध्याकाळी तापमान २६ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहील. तसेस पाऊस पडण्याची शक्यता १३ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
मात्र भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येत असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये साखळी आणि सुपर ८ लढतींसाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. या स्पर्धेत राखीव दिवस हा केवळ उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज भारत आणि पारिस्तान यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर तो राखीव दिवशी खेळवला जाणार नाही. तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. सध्या भारतीय संघ अ गटामध्ये चार गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचेही ४ गुण झाले आहे. मात्र भारतापेक्ष कमी नेट रनरेट असल्याने पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.