- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
आता हे अधिकृत झाले आहे की, बांगलादेश टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्यांच्या जागी स्कॉटलंडला समाविष्ट करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशलाभारत दौऱ्याबाबत संमती देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. परंतु, त्या कालावधीत त्यांच्याकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही.
दुर्दैवी घटनाक्रम हा एक अत्यंत दुर्दैवी घटनाक्रम आहे. कारण, टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम संघांनी सहभागी व्हावे, अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असते आणि बांगलादेशची जागतिक क्रमवारी स्कॉटलंडपेक्षा चांगली होती. बांगलादेशची अनुपस्थिती त्यांच्या देशातील क्रिकेटसाठी नक्कीच नुकसानकारक ठरेल. बांगलादेशमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर, कथितरित्या भारत सरकारने बीसीसीआयला कोलकाताच्या संघातून मुस्तफिजुर रहमानला हटवण्याचे निर्देश दिले होते. यानंतर लगेचच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सुरक्षेच्या कारणास्तव भारत दौऱ्याबाबत अत्यंत ताठर भूमिका स्वीकारली. आयसीसीने वारंवार समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही बीसीबी आपला संघ भारतात पाठवण्यास तयार झाले नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाची चूक आयपीएलचे संचालन बीसीसीआय करत असले, तरी टी-२० विश्वचषक हे आयसीसीचे आयोजन आहे. या दोन्ही गोष्टींची एकमेकांशी सांगड घालू नये, असे आयसीसीने स्पष्ट केले होते. ज्या पद्धतीने मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर करण्यात आले, त्यात त्याची कोणतीही वैयक्तिक चूक नव्हती.
बीसीबीने ठरवले असते तर त्यांनी मुत्सद्दी मार्ग स्वीकारला असता आणि आपल्या हंगामी सरकारला बीसीसीआयशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगितले असते. विशेष म्हणजे, भारत सरकारने मुस्तफिजुर किंवा इतर कोणत्याही बांगलादेशी खेळाडूला विश्वचषकात खेळण्यापासून रोखले नव्हते.
बांगलादेश पडला एकाकी
जेव्हा कोणताही तोडगा निघाला नाही, तेव्हा आयसीसीने सहभागी देशांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून बीसीबीची कोंडी केली. या मुद्द्यावर केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशचे समर्थन केले, ज्यामुळे बांगलादेश पूर्णपणे एकाकी पडला. जागतिक क्रिकेट बोर्डमध्ये मर्यादित प्रभाव असतानाही बांगलादेशने जी आडमुठी भूमिका घेतली, ती एक मोठी चूक मानली जाऊ शकते. व्यापक पाठिंब्याअभावी त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. इतकेच काय, तर बांगलादेशचे खेळाडूही सरकारने घेतलेल्या या निर्णयावर समाधानी दिसत नाहीत.
एक मोठा धक्का
१. बांगलादेश बाहेर पडल्यामुळे स्कॉटलंडसाठी दरवाजे उघडले, जे आधीपासूनच स्टँडबायवर होते. स्कॉटलंडच्या समावेशामुळे विश्वचषक नियोजित वेळापत्रकानुसार पुढे जाईल; पण बांगलादेशची अनुपस्थिती स्पर्धात्मक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर त्यांच्या खेळाडूंसाठी मोठा धक्का असेल.
२. मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये राजकीय हस्तक्षेप ही काही नवीन गोष्ट नाही. पण, अशा परिस्थिती कशा हाताळल्या जातात, हे सर्वात महत्त्वाचे असते.
३. यावेळी बांगलादेश हे आव्हान प्रभावीपणे पेलण्यात अपयशी ठरला आणि त्याचे परिणाम त्यांना दीर्घकाळ भोगावे लागतील.
४. असे निश्चितपणे म्हणता येईल की, बांगलादेशने व्यर्थ हट्टामुळे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.