नवी दिल्ली: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World test Championship) अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. मात्र आयसीसीच्या (ICC) एका निर्णयाचा परिणाम सामन्यावर होणार आहे. कोरोना संकट असल्यानं गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आयसीसीनं काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलैपर्यंत लागू असतील.
...तर लॉकडाऊन कराच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावर हरभजन सिंगचं रोखठोक वक्तव्य
आयसीसीनं गेल्या वर्षी सामन्यादरम्यान तटस्थ पंचांच्या जागी सामना होत असलेल्या देशाचे पंच निवडण्याची मुभा दिली होती. पंचांना एका देशातून दुसऱ्या देशात जावं लागू नये या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला होता. Cricinfoनं दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीनं कोविड संकट येताच लादलेले निर्बंध जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशींना बोर्डाच्या कार्यकारी समितीनं मंजुरी दिली होती. यावर आता ३१ मार्च ते १ एप्रिल दरम्यान आयसीसी बोर्डाकडून मंजुरी घेतली जाईल. त्यामुळे सामन्यात स्थानिक पंच जबाबदारी पार पाडतील.
"सॅम कुरनमध्ये मला धोनीच दिसला", इंग्लंडच्या कर्णधारानं केलं कौतुक; इतर खेळाडूंना दिला 'हा' सल्ला
लाळ वापरता येणार नाही
कोरोना संकट आणि आयसीसीचे नियम कायम असल्यानं खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही. याचा सर्वाधिक तोटा गोलंदाजांना होईल. खेळाडूंना घामाचा वापर करता येईल. खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास सध्या अंमलात असलेला नियम लागू होईल. आयसीसी लवकरच सॉफ्ट सिग्नलबद्दही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सॉफ्ट सिग्नलचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहांनी कार्यकारी समितीकडे यावर चर्चा करण्याचा आग्रह धरला होता.