"सॅम कुरनमध्ये मला धोनीच दिसला", इंग्लंडच्या कर्णधारानं केलं कौतुक; इतर खेळाडूंना दिला 'हा' सल्ला

India vs England: भारत आणि इंग्लंड दरम्यानची प्रत्येक लढत दमदार झाली. जगातील दोन सर्वोत्तम संघांमधला तिसरा एकदिवसीय सामना देखील तितकाच रोमांचक राहिली. इंग्लंडच्या कर्णधारानं या सामन्यातील सॅम कुरनच्या खेळीबाबत एक मोठं वक्तव्य केलंय.

इंग्लंडचा युवा खेळाडू सॅम कुरन यांनी तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात तुफान फटकेबाजी करत सामना रोमांचक स्थितीत आणला होता. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचे ७ फलंदाज दोनशे धावांमध्येच माघारी परतले होते. पण सॅम कुरननं आपल्या वादळी खेळीनं इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करुन दिलं होतं. त्याच्या नाबाद ९५ धावांच्या खेळीमुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं सामन्यानंतर एक मोठं विधान केलं. सॅम कुरनच्या तुफान खेळीनं महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली असं जोस बटलर म्हणाला.

इंग्लंडकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरुन सॅम कुरननं नाबाद ९५ धावांची खेळी साकारली. "सॅमनं जबरदस्त खेळ केला. सामना आम्ही गमावला असला तरी त्याच्या आजच्या खेळीनं भविष्यात त्याला आणखी प्रगती करता येईल. ज्यापद्धतीनं धोनी सामना अखेरच्या षटकापर्यंत नेणं पसंत करतो त्याचीच झलक सॅम कुरनच्या खेळीत पाहायला मिळाली", असं जोस बटलर म्हणाला.

"धोनी दिग्गज खेळाडू आहे आणि सॅमला आयपीएलमध्ये धोनीकडून नक्कीच खूप शिकता आलं आहे", असंही बटलर म्हणाला.

सॅम कुरनच्या खेळीतून इतरांनाही खूप काही शिकण्यासारखं असल्याचंही बटलर म्हणाला. "सर्वांनाच सॅमच्या खेळीतून शिकता येईल आणि अशा परिस्थितींमध्ये एकट्या फलंदाजाच्या जोरावर सामन्यात कसं पुढे जाता येतं याचा विचार आम्ही करू. सॅमनं स्वत:ला एक उत्तम खेळाडू म्हणून सिद्ध करुन दाखवलं आहे", असं बटलर म्हणाला.

आयपीएलमध्ये सॅम कुरन महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळला आहे. धोनीनं सॅमला सलामीसाठी फलंदाजीलाही पाठवलं होतं आणि त्याच वेळी सॅमचा आक्रमक अंदाज सर्वांना पाहायला मिळाला होता.

सॅम कुरननं आयपीएलच्या गेल्या मोसमात १४ सामने खेळले होते. यात २३.२५ च्या सरासरीनं १८६ धावा त्यानं केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे.

गोलंदाजीतही त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सॅमनं आयपीएलच्या गेल्या मोसमात १३ विकेट्स घेतल्या होत्या.