आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकव्याप्त-काश्मीरमध्ये (PoK) चॅम्पियन्स ट्रॉफी दौरा रद्द करण्याचे निर्देश पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) दिले होते. त्यानंतर शनिवारी ICC नं अधिकृतरित्या चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड टूरचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याआधी शुक्रवारी, यजमानपद मिरवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चॅम्पियन्स ट्रॉफी टूर कार्यक्रमात पाक व्याप्त काश्मीरमधील काही शहरांसह वेळापत्रक जाहीर केले होते. पण आता नव्या वेळापत्रकाच्या माध्यमातून ही शहरे वगळून आयसीसीनं नवा कार्यक्रम सेट केला आहे.
Pok मध्ये नो एन्ट्रीची पाटी ICC नं चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड टूरचा जो कार्यक्रम निश्चित केलाय त्यात PoK शहरांचा समावेश नाही. आयसीसीच्या अधिकृत चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्यानुसार, १६ नोव्हेंबरपासून इस्लामाबादमधून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड टूर सुरु होईल. त्यानंतर कराची, ॲबोटाबाद आणि तक्षशिला या भागात ट्रॉफी फिरवली जाईल.
भारताचा दबदबा; ICC नं बदलला पाकिस्ताननं सेट केलेला कार्यक्रमपीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने जाहीर केलेल्या वर्ल्ड टूर कार्यक्रमावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी पीओके प्रदेशात ट्रॉफी टूर योजनेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ICC नं यासंदर्भातील नवा कार्यक्रम आखला आहे. भारतासमोर पुन्हा एकदा पाकला नमतं घ्यावे लागले आहे, हीच गोष्ट नव्या वेळापत्रकातून समोर येते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड टूर कार्यक्रम
- १६ नोव्हेंबर, २०२४ – इस्लामाबाद, पाकिस्तान
- १७ नोव्हेंबर, २०२४ - तक्षशिला आणि खानपूर, पाकिस्तान
- १८ नोव्हेंबर, २०२४ – ॲबोटाबाद , पाकिस्तान
- १९ नोव्हेंबर, २०२४ - मुरी, पाकिस्तान
- २० नोव्हेंबर, २०२४ - नाथिया गली, पाकिस्तान
- २२ ते २५ नोव्हेंबर, २०२४ – कराची, पाकिस्तान
- २६ ते २८ नोव्हेंबर, २०२४ - अफगाणिस्तान
- १० ते १३ डिसेंबर, २०२४ - बांगलादेश
- १५ ते २२ डिसेंबर, २०२४ - दक्षिण आफ्रिका
- २५ डिसेंबर, २०२४ ते ५ जानेवारी, २०२५ - ऑस्ट्रेलिया
- ६ ते ११ जानेवारी, २०२५ - न्यूझीलंड
- १२ ते १४ जानेवारी, २०२५ - इंग्लंड
- १५ ते २६ जानेवारी, २०२५ - भारत
- २७ जानेवारी २०२५ – कार्यक्रमाची सुरुवात- पाकिस्तान