ICC ODI World Cup IND vs NED Live : रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतीत अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. विराट त्याच्या IPL फ्रँचायझीच्या घरच्या मैदानावर आज पन्नासावे शतक झळकावेल अशी अनेकांची इच्छा होती. पण, व्हॅन डेर मर्वच्या अप्रतिम चेंडूने विराटचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्का शर्माचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
अव्वल कॅप्टन! रोहित शर्मा जगातील कर्णधारांमध्ये 'हिट' झाला, ७ मोठ्या विक्रमांचा पाऊस पाडला
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. शुबमनने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या ५१ धावांवर बाद झाला. रोहितसह त्याची ११.५ षटकांतील १०० धावांची भागीदारी संपुष्टात आली. या वर्षात रोहित व शुबमन यांची ही पाचवी शतकी भागीदारी आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रान व रहमनुल्लाह गुरबाज यांनी ४ शतकी भागीदारी केल्या आहेत. विराट कोहली मैदानावर येताच चिन्नास्वामी स्टेडियमवर कल्ला झाला... RCB चे हे होम ग्राऊंड असल्याने विराट समर्थक खूप मोठ्या प्रमाणात होते, परंतु विराट थोडा दडपणात दिसला. त्यात नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी त्याला जखडून ठेवले होते व त्याचे झेलही थोडक्यात सुटले.

रोहित दुसऱ्या बाजूने त्याचा खेळ करत होता आणि त्याने ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. बॅस डे लीडने ही विकेट मिळवली आणि नेदरलँड्सकडून वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १५ विकेट्सचा विक्रम त्याने नावावर केला. त्याने त्याच्या वडिलांचा टीम डे लीड ( १४) यांचा विक्रम मोडला. खेळपट्टीवर सावरलेल्या विराटने त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारताचा डाव सावरला आणि ६६ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. ५६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर कोहली त्रिफळाचीत झाला. रोएलॉफ व्हॅन डेर मर्वने त्याचा त्रिफळा उडवला. वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक ७ वेळा पन्नासहून अधिक धावांच्या सचिन तेंडुलकर ( २००३) व शाकिब अल हसन ( २०१९) यांच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली.

वर्ल्ड कपमध्ये विराट दुसऱ्यांचा फिरकीपटूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. २०१५मध्ये सिकंदर रझाने त्याची दांडी गुल केली होती. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये घरच्या मैदानावर १०० चौकार खेळणारा विराट सचिन तेंडुलकरनंतर ( ११६) दुसरा फलंदाज आहे. शिवाय भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सलग ३५ सामने खेळण्याचा युनिक विक्रम विराटने नावावर केला. जवागल श्रीनाथ ( ३४) व मोहम्मद अझरुद्दीन ( ३०) यांना त्याने मागे टाकले.