अव्वल कॅप्टन! रोहित शर्मा जगातील कर्णधारांमध्ये 'हिट' झाला, ७ मोठ्या विक्रमांचा पाऊस पाडला

ICC ODI World Cup IND vs NED Live : रोहित शर्माने पुन्हा एकदा भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली आणि जगात एकाही कर्णधाराला न जमलेला विक्रम नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाशीही आज बरोबरी केली.

रोहितने आज पहिला षटकार खेचून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ( ५९) षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. २०१५ मध्ये एबी डिव्हिलियर्सने ५८ षटकार खेचले होते. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही रोहितने या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला आणि २०१९मध्ये इयॉन मॉर्गनचा २२ षटकारांचा विक्रम त्याने मोडला. रोहित मात्र सूसाट सुटलेला आणि त्याने पॉवरप्लेमध्ये वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १७ षटकारांच्या ब्रेंडन मॅक्युलमच्या ( २०१५) विक्रमाशी बरोबरी केली.

सचिन तेंडुलकरनंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकाच पर्वात ५००+ धावांचा दोन वेळा विक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. सचिनने १९९६ व २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये हा पराक्रम केला होता. पण, रोहितने सलग दोन ( २०१९ व २०२३) वर्ल्ड कपमध्ये ५०० हून अधिक धावा केल्या. सलग दोन वर्ल्ड कपमध्ये अशी खेळी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ५०० हून अधिक धावा करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. केन विलियम्सन ५७८ ( २०१९), महेला जयवर्धने ५४८ ( २००७), रिकी पाँटिंग ५३९ ( २००७) आणि आरोन फिंच ५०७ ( २०१९) यांनी रोहितच्या आधी हा पराक्रम केला आहे.

रोहितने आज विराट कोहलीसोबत वन डे क्रिकेटमध्ये अधिक धावांच्या भागीदारीमध्ये गॉर्डन ग्रिनिज व हायनेस ( ५२०६) यांना मागे टाकले. या विक्रमात सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर ८२२७ धावांसह अव्वल स्थानी आहे. महेला जयवर्धने व कुमार संगकारा ( ५९९२), तिलकरत्ने दिलशआन व कुमार संगकारा ( ५४७५), मार्वन अट्टापटू व सनथ जयसूर्या ( ५४६२) हे भारतीय जोडीच्या पुढे आहेत. रोहितने शिखर धवनसोबत ५१९३ धावा जोडल्य आहेत.

रोहितने आज बंगळुरूच्या मैदानवार ३२ वा आंतरराष्ट्रीय षटकार खेचला आणि एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. सचिन तेंडुलकरने शाहजाह येथे ३० षटकार खेचले आहेत. त्यानंतर रोहितचा क्रमांक येतो. त्याने Vizag येथे २५ सिक्स मारले आहेत.

वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत ५०० धावा करणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्याने सर्वाधिक धावा करण्याचा सौरव गांगुलीचा ( ४४२) विक्रमही मोडला. विराट कोहलीने २०१९मध्ये ४४३, मिताली राजने २०१७मध्ये ४०९ व मोहम्मद अझरुद्दीनने १९९२ मध्ये ३३२ धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून १४ हजार धावांचा टप्पाही त्याने आज ओलांडला. वीरेंद्र सेहवाग ( १५७५८) आणि सचिन तेंडुलकर ( १५३३५) यांच्यानंतर रोहित हिट ठऱला. वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहितने आज १३ व्यांदा ५०+ धावा केल्या. सचिन तेंडुलकर ( २१) व विराट ( १४) हे त्याच्या पुढे आहेत.