ICC ODI World Cup AUS vs NED Live : डेव्हिड वॉर्नरनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले आहे. पाकिस्तानपाठोपाठ त्याने आज नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना ९१ चेंडूंत शतक झळकावले. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे २२वे शतक ठरले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सलग दोन शतकं झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. मार्क वॉ ( १९९६), रिकी पाँटिंग ( २००३-२००७), मॅथ्यू हेडन ( २००७) यांनी असा पराक्रम केला आहे.
अडखळत्या सुरुवातीनंतर सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोप दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतला. मिचेल मार्श ( ९) चौथ्या षटकात माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडीने चांगली फटकेबाजी केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह ११८ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. स्मिथ ६८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७१ धावांवर झेलबाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धेतील स्मिथने १०व्यांदा ५०+ धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंग ( ११) या लिस्टमध्ये टॉपला आहे. स्मिथने आज अॅडम गिलख्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.
वर्ल्ड कप स्पर्धेत ६ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने सर्वाधिक ७ शतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर व वॉर्नर यांच्या नावावर प्रत्येकी ६ शतकं आहेत.