ICC Rankings Update : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Rankings) मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजीतील आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. याशिवाय विराट कोहली आघाडीच्या (Virat Kohli Top 5 ICC Rankings) पाच फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. बाबर आझमचा खराब फॉर्म विराट कोहलीसाठी फायद्याचा ठरल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमला मागे पडला! टॉप ५ मध्ये ३ भारतीय
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा ७८१ गुणांसह अव्वलस्थानी आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान ७६४ रेटिंग पॉइंट्स सह दुसऱ्या तर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल ७४६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर असून शुभमन गिल ७४५ रेटिंग पॉइंट्स सह क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीचा नंबर लागतो. विराट कोहली एका स्थानांच्या सुधारणेसह ७२५ रेटिंग पॉइंटस कमावत सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा बाबर आझम टॉप ५ मधून बाहेर फेकला गेला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील खराब कामगिरीमुळे बाबर आझमची (७०९ रेटिंग पॉइंट्स) पाचव्या स्थानावरुन थेट सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
गोलंदाजीत टॉप १० मध्ये फक्त कुलदीप यादव
ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत राशीद खान ७१० रेटिंग पॉइंट्स मिळवत अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांचा नंबर लागतो. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताकडून फक्त कुलदीप यादव टॉप १० मध्ये दिसतो.