ICC ODI Rankings : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवले. या कामगिरीमुळे पाकिस्ताननेआयसीसी वन डे क्रमवारीत सुधारणा करताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला धक्का दिला आहे. पाकिस्तानचा संघ आयसीसी वन डे क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.  या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ 102 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होता. 
  वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर पाकिस्तानने 106 गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पण, 
भारतीय संघ 105 गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांनी झिम्बाब्वे व दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत इमाम-उल-हक याने दमदार कामगिरी केली. त्याने तिनही लढतीत 50+ धावा केल्या आणि वन डे क्रिकेटमध्ये सलग 7 सामन्यांत 50+ धावा करण्याचा विक्रम त्याने नावावर केला.  
भारताला क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. भारताला आगामी वन डे मालिकेत इंग्लंड व वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. न्यूझीलंडचा संघ 125 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड ( 124) व ऑस्ट्रेलिया ( 107) यांचा क्रमांक येतो.