दुबईः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. 1ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून या अजिंक्यपद स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा हाही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. भारतीय संघ सध्या कसोटी क्रमावारीत अव्वल स्थानावर आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेतून या स्पर्धेची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अँटीग्वा येथे, तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत जमैका येथे होणार आहे. या कालावधीत भारतीय संघ घरच्या आणि परदेशात प्रत्येकी तीन कसोटी मालिका खेळणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण देण्यात येणार आहेत. जितक्या सामन्यांची मालिका त्यामुसार 120 गुणांची विभागणी प्रत्येक सामन्यासाठी होईल.
भारतीय वेळापत्रक
जुलै-ऑगस्ट 2019 : दोन कसोटी वि. वेस्ट इंडिज (अवेय)
ऑक्टोबर- नोव्हेंवर 2019 : तीन कसोटी वि. दक्षिण आफ्रिका (होम)
नोव्हेंबर 2019 : 2 कसोटी वि. बांगलादेश ( होम)
फेब्रुवारी 2020 : 2 कसोटी वि. न्यूझीलंड ( अवेय)
डिसेंबर 2020 : 4 कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( अवेय)
जानेवारी-फेब्रुवारी 2021 : 5 कसोटी वि. इंगंल्ड ( होम)