भारताचा स्टार गोलंदाज जयप्रीत बुमराह क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावे आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे असेल.
दुखापतींवर मात करून दीर्घकाळानंतर भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर जसप्रीत बुमराहला वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यापासूनच सूर गवसलेला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यात मिळून ८ बळी टिपले आहेत. जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन करत पाकिस्तानी गोलंदाजांनी एकेका धावेसाठी झगडायला लावले होते. आता बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी एक मोठा विक्रम बुमराहला खुणावत आहे. हा विक्रम ३१ वर्षांपूर्वीचा असून, तो कपिल देव यांनी रचला होता.
जसप्रीत बुमराने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १२ सामन्यांमध्ये २६ बळी टिपले आहेत. बांगलादेशविरुद्धचा सामना त्याचा या स्पर्धेतील १३वा सामना असेल. या सामन्यात जसप्रीत बुमराह कपिल देव यांच्या पुढे जाऊ शकतो. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेतलेल्या गोलंदांजांमध्ये कपिल देव यांच्या नावाचा समावेश आहे. कपिल देव यांनी १९७९ ते १९९२ या काळात मिळून २८ बळी टिपले होते. आता कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी जसप्रीत बुमराला ३ बळींचा आवश्यकता आहे. जर पुढच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ३ बळी टिपले तर तो कपिल देव यांना मागे टाकून पुढे निघून जाईल.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांची नावं पुढीलप्रमाणे आहेत
झहीर खान -४४
जवागल श्रीनाथ - ४४
मोहम्मद शमी - ३१
अनिल कुंबळे -३१
कपिल देव - २८
जसप्रीत बुमराह - २६