Join us  

सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम

गुणपद्धत सोपी करणार. आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेद्वारे WTC स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला होणार सुरूवात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 9:05 AM

Open in App
ठळक मुद्देगुणपद्धत सोपी करणार.आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेद्वारे WTC स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला होणार सुरूवात.

दुबई : आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेद्वारे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी काही नियम स्पष्ट केले सून, यानुसार सामना जिंकल्यावर १२ गुण, तर अनिर्णीत राखल्यास चार गुण मिळतील, तसेच सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ६ गुण मिळतील.

आयसीसीने पुढे सांगितले की, ‘२०२१-२३ सत्रातील क्रमवारी निश्चित करण्यासाठी विजयी गुणांचा उपयोग करण्यात येईल.’ याआधी प्रत्येक कसोटी मालिकेसाठी १२० गुण निर्धारित करण्यात आले होते. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. कारण दोन सामन्यांच्या मालिकेतील एक कसोटी जिंकल्यास संघाला ६० गुण मिळायचे, तर पाच सामन्यांच्या मालिकेतील एक सामना जिंकल्यावर केवळ २४ गुण मिळायचे.

आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी ज्योफ अलार्डिस म्हणाले की, ‘मागच्या वर्षी झालेल्या समस्या लक्षात घेता यंदा गुणांची प्रणाली अधिक सोपी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील सत्रातील गुण पद्धत सोपी करण्यात यावी, याबाबत आम्हाला अनेक सूचना आल्या होत्या. 

अशी असेल नवी गुण पद्धतप्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्याने गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीने प्रत्येक सामन्याला समान गुण दिले. त्यानुसार प्रत्येक विजयासाठी १२ तर टायसाठी समान ६-६ गुण असतील. सामना अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण असतील. गुणांसोबतच टक्केवारीही निश्चित करण्यात आली. त्यानुसार १२ गुणांना शंभर टक्के, सहा गुणांना ५० टक्के आणि चार गुणांना ३३.३३ टक्के दिले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत २४, तीन सामन्यांच्या मालिकेत ३६, चार सामन्यांच्या मालिकेसाठी ४८ तसेच पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असणार आहेत.

कुणाच्या वाट्याला किती सामनेदोन वर्षांत इंग्लंड सर्वाधिक २१ तर भारत १९ सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया १८ तसेच द. आफ्रिका १५ सामने खेळेल. डब्ल्यू  टीसीचे पहिले सत्र विजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला १३ सामने येतील. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ प्रत्येकी १३ तर पाकिस्तान संघ १४ सामने खेळेल. बांगला देशला १२ सामने खेळायचे आहेत.

टॅग्स :भारतइंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआयसीसी