आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात भारत-पाक यांच्यात फिल्डबाहेर सामना सुरु आहे. या स्पर्धेसंदर्भात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आपली भूमिका एकदम स्पष्ट केलीआहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही, यावर भारत ठाम आहे. आशिया कप स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धा देखील हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून खेळवावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. दुसरीकडे पाकिस्तान मात्र आता पुन्हा ती गोष्ट करण्यासाठी तयार नाही. PCB हायब्रीड मॉडेलसाठी तयार नाही. यास्पर्धेसंदर्भात आयसीसी फायनली काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. आयसीसीच्या बैठकीत फायनल निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे.
कधी अन् कुठं होणार आहे आयसीसीची बैठक?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आज शनिवारी २९ नोव्हेंबरला बैठक होणार आहे. दुबईत होणारी ही बैठक भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ४ वाजता नियोजित आहे. या बैठकीत भारत-पाक क्रिकेट बोर्डाचे सदस्यही सहभागी होतील. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील मुद्दा प्रामुख्याने चर्चेत घेतला जाईल. आयसीसीकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेलचा पर्याय दिला जाऊ शकतो. जर पाकिस्तान आपल्या मतावर ठाम राहिला तर त्यांच्याशिवाय स्पर्धा खेळवण्याचा विचारही होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
ICC समोर मोठं चॅलेंज?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाक क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेमुळे आयसीसीसमोर एक मोठं चॅलेंज निर्माण झाले आहे. या मुद्यावर सरळ सोपा मार्ग काढण्यासाठी ICC प्रयत्नशील असेल. पाकिस्तानमध्ये जाऊन न खेळण्यासंदर्भात ICC भारतावर कठोर कारवाई करू शकत नाही. कारण भारतीय संघाल स्पर्धेतून आउट केले तर याचा मोठा फटका ICC ला बसेल. दुसरीकडे पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम राहिला अन् त्यांना आउट करण्याची वेळ आली तर तेही पारदर्शी वाटणार नाही. या परिस्थितीत आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर काही खास ऑफर ठेवून हायब्रिड मॉडेलसह त्यांना तयार करण्यासाठी प्रयत्नशील असेल. ICC चा हा डाव यशस्वी ठरला तर तो भारताचा विजय असेल. त्यामुळे नेमकं काय होणार? आजच्या बैठकीत फायनल निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल.