Mumbai Indians Champion, WPL 2025: महिलांची फ्रँचायझी टी२० स्पर्धा WPLच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभूत केले आणि दुसरे विजेतेपद जिंकले. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ६६ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७ बाद १४९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मारिझेन कापच्या ४० धावांच्या बळावर दिल्लीला २० षटकात १४१ धावाच करता आल्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवत WPL ट्रॉफी उंचावली. हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) सामनावीर ठरली तर मुंबई संघाची नॅट स्कायव्हर-ब्रंट मालिकावीर ठरली. पण सामना नेमका कुठे फिरला याबद्दल कोच शार्लेट एडवर्ड्सने सांगितले.
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षक शार्लेट एडवर्ड्स म्हणाली, दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग अतिशय अनुभवी आहे. तर सलामीवीर शेफाली वर्मा ही तुफानी सुरुवात करून देण्यात निष्णात आहे. या दोघींना लवकर बाद केल्यामुळे खऱ्या अर्थाने सामन्याचा निकाल आमच्या बाजूने फिरला. सुरुवातीच्या विकेट्समुळे मुंबई संघाला WPL विजेतेपद जिंकण्यास मदत झाली. विजयासाठी १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाला नऊ विकेट गमावून केवळ १४१ धावा करता आल्या. त्या दोघी टिकल्या असत्या तर निकाल वेगळाही लागू शकला असता, असे कोच एडवर्ड्स म्हणाली.
कोच एडवर्ड्सने ४४ चेंडूत ६६ धावा करणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले. "हरमन शांत मनाने खेळत होती. ती खूपच अप्रतिम आहे आणि तिला आणखी एक विजेतेपद जिंकायचे होते हे तिने मनात पक्के ठरवले होते. म्हणून तिने तिला शक्य ते सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ती कर्णधार म्हणूनही उत्तम आहे. युवा खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळ कसा करवून घ्यायचा याचा तिला चांगला अनुभव आहे. म्हणूनच तिच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली आहे, असे एडवर्ड्स म्हणाली.
Web Title: How exactly did Mumbai Indians turn the WPL Final match Coach reveals turning point
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.