Shubman Gill Test Captaincy Team India IND vs ENG: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्याने याबाबत जाहीर केले. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाचा नवा कर्णधार म्हणून शुबमन गिल याच्यावर विश्वास दाखवला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील कसोटी संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. हा संघ २० जूनपासून इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. संघात काही अनुभवी चेहरे असतानाही गिलला कर्णधारपद देण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय काहींना पटलेला नाही. भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने तर गिलबद्दल अतिशय खरमरीत मत व्यक्त केले आहे.
"शुबमन गिल हा कदाचित दुसरा सर्वोत्तम पर्याय असू शकला असता, पण पहिली पसंती मूळीच नाही. ज्या खेळाडूची संघाच्या प्लेइंग ११ मध्येही जागा निश्चित नसते, अशा खेळाडूला कसोटी संघाचा कर्णधार कसा केला जातो? मला तरी असं वाटतंय की निवडकर्ते सर्वोत्तम पर्याय शोधत नव्हते, दुसऱ्या पसंतीचा खेळाडूच शोधत होते आणि तो गिल होता. म्हणून हा असा निर्णय घेतला गेला आहे," असे मनोज तिवारी म्हणाला.
याच मुद्द्यावर विरेंद्र सेहवागने अनिल कुंबळेने वेगळे मत मांडले. "भारताचे सर्वच खेळाडू चांगले आहेत. पण टीम इंडियाचे नेतृत्व करणे हे IPL टीम किंवा राज्यांच्या संघाच्या कॅप्टन्सीपेक्षा वेगळे असते. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसोबत काही जबाबदाऱ्याही येतात आणि तितकाच दबावही असतो. पण मला खात्री आहे की शुबमन गिल यातून नक्कीच मार्ग काढेल, कारण तो तितका सक्षम आहे. रोहित, विराट, अश्विनशिवाय क्रिकेट पाहणे सर्वांसाठी नवीन गोष्ट असणार आहे. पण कधी ना कधी हा बदल होणार होताच. ही नव्या पिढीची सुरुवात आहे. शुबमन गिल नक्कीच त्याला मिळालेल्या अनुभवाचा फायदा करून घेईल," असे मत अनिल कुंबळेने व्यक्त केले.