दोन, तीन वर्षांपूर्वीपर्यंत चेतन सकारिया याचं नाव भारताच्या उगवत्या गोलंजाजांमध्ये घेतलं जात असे. मात्र सततच्या दुखापतींमुळे त्याची कारकीर्द अचडणीत आली होती. त्यातच वडील आणि भावाच्या मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने तो हादरून गेला होता. मात्र आता या सर्वावर मात करत चेतन हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
खूप कष्ट घेऊन आपली क्रिकेट कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या चेतन सकारियाच्या वडिलांचं आणि धाकट्या भावाचं २०२१ मध्ये निधन झालं होतं. या आपत्तीमुळे त्याला मोठा धक्का बसला होता. मात्र याच कठीण काळाने आपल्याला जीवन आणि करिअरमध्ये येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यास शिकवलं, असे चेतन सांगतो.
तो म्हणाला की, माझ्या जीवनात जी वेळ आली, ती अनपेक्षित होती. जर मी क्रिकेटपटू झालो नसतो तर मी पुन्हा खऱ्या जीवनाकडे परतू शकलो असतो असं वाटत नाही. आता माझ्या जीवनात काही कठीण परिस्थिती आली तर मी तिचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे मला वाटते, आता अशा परिस्थितीला कसे साामोरे जायचे याची माहिती मला झाली आहे, असे चेतन याने सांगितले.
चेतन सकारिया पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र भारतीय संघात येण्यासाठी आपल्याका खूप कठोर मेहनत घ्यावी लागेल, याची त्याला जाणीव आहे. चेतन याने आतापर्यंत भारताकडून एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. मी राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो, असं मला वाटतं. आता मला तंत्रावर काम करावं लागेल, जेणेकरून मला लय मिळवता येईल. मात्र माझ्या खेळात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे, ही माझ्यासाठी सकारात्मक बाब आहे, असेही त्याने सांगितले.