यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मिळवलेल्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज यश दयाल हा अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत एका महिलेने एफआयआर दाखल केली आहे. यश दयाल याने आपलं मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं, असा आरोप या महिलेने तक्रारीमधून केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयापर्यंत करण्यात आली आहे.
याबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार ‘’मागच्या पाच वर्षांपासून मी यश दयालसोबत नात्यात होते, आम्हा दोघांचे कुटुंबीयही एकमेकांना भेटले होते’’, असा दावा पीडित महिनेले केला आहे. तसेच यश दयाल याने आपलं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं, असा आरोप या महिलेने एफआयआरमधून केला आहे.
‘’माझ्याकडे यश दयालसोबत झालेल्या संभाषणाचे सर्व चॅट्स, स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ कॉल्सचे सर्व पुरावे आहेत, तसेच हे पुरावे यश दयालवर मी केलेल्या आरोपांना सिद्ध करतात, असेही पीडितेने म्हटले आहे. दरम्यान, यश दयाल याचे इतरही काही महिलांसोबत अशाच प्रकारचे संबंध होते, असा आरोपही करण्यात आला आहे. तसेच सध्या आपण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या असहाय्य स्थितीत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. आता न्यायासाठी या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत धाव घेतली आहे.
दरम्यान, या महिलेने केलेल्या आरोपांबाबत यश दयाल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघव्यवस्थापनाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यश दयाल हा २०२४ पासून आरसीबीच्या संघात आहे. तसेच २०२५ मध्ये आरसीबीने मिळवलेल्या विजेतेपदात त्याने मोलाचा वाटा उचललेला आहे. तत्पूर्वी यश दयाल हा गुजरात टायटन्सच्या संघात होता. तसेच २०२२ साली गुजरातने विजेतेपद मिळवलं तेव्हा तो त्या संघाचा सदस्य होता.