भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अनेकदा दोन्ही संघातील खेळाडूंमधील वादाचा मुद्दा गाजल्याचे पाहायला मिळाले आहे. पण गेल्या काही काळात दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात अगदी खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळाले आहे. पण दुबईच्या मैदानात पुन्हा एकदा दोन्ही संघातील खेळाडूंच्या जुन्या वादाची आठवण करणारा सीन पाहायला मिळाला. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेताना रिझवानने भारतीय गोलंदाजाला खांदा मारल्याचे पाहायला मिळाले. यावर हर्षित राणानं काय हे...असं करतोय हे...असं काहीसं म्हणत राग व्यक्त केला. दुसरीकडे ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या कोच गौतम गंभीरची रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडंल जाणून घेऊयात सविस्तर
इथं पहा व्हायरल व्हिडिओ
भारत-पाक यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हर्षित राणा गोलंदाजी करून खेळपट्टीवर उभा असताना धावा घेताना मोहम्मद रिझवान त्याच्या खांद्यावर खांदा मारताना दिसून येते. जर व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला तर मोहम्मद रिझवानच वाट वाकडी करून लक्ष नाही असं दाखवत गोलंदाजाला धडकल्याचे दिसते. हर्षित राणाही मी माझ्या जागेवर आहे जरा पुढे बघ की, असंच काहीस म्हणताना दिसून येते. हा सर्व प्रकार पाकिस्तानच्या डावातील २० व्या षटकात घडला. व्हिडिओमध्ये ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या गौतम गंभीरची रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरतीये.
समलोचकांना आठवली शाहिद आफ्रिदी अन् गौतम गंभीरची धडक
२००७ मध्ये पाकिस्तान संघाने भारतीय दौऱ्यावर ५ वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेतील कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात वादावादीचा किस्सा घडला होता. यावेळी आफ्रिदी बॉलिंग करत असताना गौतम गंभीर एकेरी धाव घेताना दोघांची टक्कर झाली होती. त्यानंतर दोघांच्यात रंगलेली शाब्दिक चकमक क्रिकेट चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. हर्षित राणा अन् मोहम्मद रिझवान यांच्यात फारसा शाब्दिक वाद रंगला नाही. पण दोघांच्यातील टक्कर जुन्या जमान्यातील काही आठवणींना उजाळा देऊन गेली. समालोचकांनी लाइव्ह कॉमेंट्रीमध्ये ते बोलूनही दाखवले.