Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघ गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्याची तयारी करत आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची लवकरच निवड केली जाणार आहे. सध्या असा दावा करण्यात आला आहे की, दुखापतग्रस्त भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने पांड्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पांड्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग असणार नाही.
आधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळणार
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये वडोदरा संघाकडून खेळून क्रिकेट मैदानावर परतणार होता. ही स्पर्धा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला खेळवण्यात येणार होती, परंतु आता प्लॅन बदलण्यात आला आहे. अहवालानुसार, टीम इंडियासाठी थेट वनडे खेळण्याऐवजी पांड्या आधी ३० नोव्हेंबर किंवा २ डिसेंबर रोजी वडोदरा संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात खेळणार आहे.
पांड्या संध्या रिहॅब सेंटरमध्ये
हार्दिक पांड्या सप्टेंबरमध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. गेल्या काही आठवड्यांपासून तो बेंगळुरूमधील सेंटर फॉर एक्सलन्समध्ये उपचार घेत आहे. यामुळे त्याला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेत खेळता आले नाही आणि आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नाही. तो कदाचित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत पुन्हा खेळू शकेल.