IND vs PAK: "कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते", हरभजन सिंगने व्यक्त केला संताप

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:21 IST2022-09-05T12:19:39+5:302022-09-05T12:21:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Harbhajan Singh has responded to those who criticized Arshdeep Singh after losing the IND vs PAK match | IND vs PAK: "कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते", हरभजन सिंगने व्यक्त केला संताप

IND vs PAK: "कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते", हरभजन सिंगने व्यक्त केला संताप

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. यूएईच्या धरतीवर सुरू असलेली ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्यात पाकिस्तानने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने 1 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. मात्र भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) आसिफ अलीचा झेल सोडला त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, आसिफ अलीचा झेल सोडल्यानंतर त्याने संधीचा फायदा घेत चौकार आणि षटकार लगावले. अखेर भारताला स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र अर्शदीपने अखेरचे षटक टाकून सामना भारताकडे वळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात अपयश आले. सध्या अर्शदीपवर टीका होत असताना भारतीय संघातील आजी-माजी खेळाडू त्याच्या मदतीसाठी धावून आले आहेत. 

विराट कोहलीने केली पाठराखण 
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत अर्शदीप सिंगची पाठराखण केली. "जेव्हा मी पाकिस्तानविरूद्ध पहिल्यांदा खेळलो होतो, तेव्हा मी खराब शॉर्ट मारून बाद झालो होतो. त्यानंतर मला वाटले की मी कधीच खेळू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला वाईट वाटते, मात्र संघातील वातावरण खूप चांगले आहे. प्रत्येकजण आपल्या चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक खेळाचा भाग आहे", अशा शब्दांत कोहलीने अर्शदीपची पाठराखण केली. 

हरभजनने टीकाकारांना सुनावले 
विराट कोहलीशिवाय माजी खेळाडू हरभजन सिंग अर्शदीप सिंगच्या मदतीला धावून आला आहे. हरभजनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "अर्शदीप सिंगवर टीका करणे थांबवा. कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही. आम्हाला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे. पाकिस्तानच्या संघाने शानदार खेळ केला. लाज वाटते अशा लोकांची जे संघाबद्दल काहीही गोष्टी बोलून आपल्याच खेळाडूंना कमी लेखतात. अर्शदीप हे सोनं आहे." हरभजन सिंगने ट्विट करून टीकाकारांना चांगलेच सुनावले आहे.  



 

Web Title: Harbhajan Singh has responded to those who criticized Arshdeep Singh after losing the IND vs PAK match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.