Harbhajan Singh Blunt Reply To Bangladesh On Not Playing T20 World Cup In India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला IPL २०२६ मधून बाहेर करण्याची मागणी देशभरातून करण्यात आली. या प्रकरणात बीसीसीआयने शाहरुखच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघाला ९.२ कोटी रुपये दिलेल्या या खेळाडूला रिलीज करण्यास सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI च्या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाची थेट ICC कडे धाव
BCCI च्या भूमिकेनंतर आता बांगलादेशच्या संघाने आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय मैदानात न खेळण्याची भूमिका घेतली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने थेट ICC कडे धाव घेत सामने दुसऱ्या देशातील मैदानात स्थलांतरित करण्याची विनंती केली आहे. यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने सावध प्रतिक्रिया दिल्याचे दिसते.
जे झालं ते चुकीचं! हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेटसंदर्भात तापलेल्या मुद्यावर एएनआयला प्रतिक्रिया देताना हरभजन सिंग म्हणाला की, बांगलादेशमध्ये जे काही घडले ते चुकीचे होते. भारत सर्वांचे स्वागत करतो. भारतात यायचे की नाही, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या विनंतीवर ICC अंतिम निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया भज्जीने दिली आहे.
बांगलादेश संघ भारतातील दोन मैदानात खेळणार होता चार लढती, पण...
७ फेब्रुवारीपासून भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला संघही जाहीर केला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, साखळी फेरीत बांगलादेशचे तीन सामने हे कोलकाताच्या मैदानात नियोजित असून एक सामना मुंबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पण बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करत ICC कडे सामने भारताबाहेर खेळवण्याची विनंती केली आहे. BCCI ने नव्याने वेळापत्रक तयार करण्याची तयारी दर्शवल्याचेही समजते. त्यामुळे बांगलादेशचे सामना पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेच्या मैदानात खेळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.