Join us

ड्रग्ज, गुन्हेगारीपासून दूर ठेवणारी ‘गुरू गॅरी’ यांची शाळा, झोपडपट्टीतील मुलांना क्रिकटचे धडे

केपटाऊनमध्ये मुलामुलींना देत आहेत क्रिकेटचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 05:29 IST

Open in App

केपटाऊन : २२ यार्डची खेळपट्टी, एक चेंडू, बॅट आणि विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन. जगातील सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या खयेलित्शा येथील मुले टोळीयुद्ध, गरिबी आणि ड्रग्जच्या व्यसनापासून वाचण्यासाठी क्रिकेटची कला शिकत आहेत आणि त्यांना शिकवणारे दुसरे कोणी नसून भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आहेत.  कृष्णवर्णीय मुलांना समान दर्जा देण्यासाठी आणि खेळात समान संधी उपलब्ध करून देण्याची ही अनोखी मोहीम ‘गुरू गॅरी’ यांची आहे, ज्यांनी वंचित घटकांतील अनेक मुलांचे आयुष्य बदलून टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या आग्नेय-पूर्वेस सुमारे ३० किमी अंतरावर असलेली खयेलित्शा ही जगातील पाच सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये समाविष्ट आहे. ड्रग्जमुळे हे सर्वांत असुरक्षित क्षेत्र मानले जाते.

कर्स्टनच्या कॅच ट्रस्ट फाउंडेशनने येथील पाच शाळांमध्ये ५ ते १९ वर्षे वयोगटातील एक हजाराहून अधिक मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. १५ वर्षीय लुखोलो मालोंगने सांगितले की, मी विराट कोहलीला प्रेरणास्थान मानतो. तो मला कधीही हार न मानण्याची प्रेरणा देतो. मला एक दिवस दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे आहे. कधीही हार न मानण्याची भावना, कठोर परिश्रम आणि काहीतरी साध्य करण्याची जिद्द मी कोहलीकडून शिकतो. मी त्याला केपटाऊनच्या मैदानावर पाहिले आहे; पण एक दिवस त्याला भेटायला आवडेल. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदादरम्यान कृष्णवर्णीयांना शहरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात १९८३मध्ये खयेलित्शा झोपडपट्टी तयार झाली. येथे २५ लाखांहून अधिक लोक राहतात आणि ९९.५ टक्के कृष्णवर्णीय आहेत, ज्यांचे जीवन संघर्षमय आहे. अशा परिस्थितीत अमली पदार्थ आणि गुन्हेगारीची वाईट छाया मुलांवर लहानपणीच पडते. लुखोलोचे आई-वडील घरगुती मदतनीस म्हणून काम करतात. तो आणि त्याचा नऊ वर्षांचा  मित्र टायलन हे शेकडो मुलांपैकी एक आहेत. ते २२ यार्डच्या खेळपट्टीमध्ये जीवनाचा नवीन अर्थ शोधत आहेत.

क्रिकेटमुळे मला ड्रग्जपासून दूर राहण्यास आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. मला एक दिवस दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे आहे. आई माझी सर्वांत मोठी समर्थक आहे आणि मला येथे पाहून खूप खूश आहे.- लुखोलो, फिरकी गोलंदाज

मी जेव्हा भारतातून येथे आलो, तेव्हा मी केपटाऊनमधील सर्वांत गरीब भागाला भेट दिली. तेव्हा मी पाहिले की, येथे क्रिकेट हा खेळ नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. त्यानंतर मी हे केंद्र सुरू करण्याचा विचार केला. दोन शाळांमधून सुरुवात केल्यानंतर आता मी पाच शाळांमध्ये हे केंद्र चालवत आहे.     - गॅरी कर्स्टन, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक 

   यष्टीरक्षक फलंदाज टायलान म्हणाला की, आजूबाजूचे लोक खूप हिंसक आहेत. त्यामुळे आम्ही आमचा दिवस येथे घालवतो. आम्ही २०१९ पासून क्रिकेट खेळत आहे. ऋषभ पंत आणि जोस बटलर यांच्यासारखा खेळाडू व्हायचे आहे. 

टॅग्स :द. आफ्रिकाआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड