स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील गुजरात जाएंट्स या दोन संघांच्या लढतीनं महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात झालीये. या सामन्यात नाणेफेक जिंकून स्मृती मानधनाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् पॉवर प्लेमध्येच रेणुका सिंग ठाकूरनं आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देत कर्णधारानं घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या मॅचमधील पहिली विकेट पुन्हा पुन्हा पाहण्याजोगी अशी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् रेणुकानं अप्रतिम चेंडूवर लॉराला केलं बोल्ड
गुजरात जाएंट्सच्या संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या लॉरा वॉल्व्हार्ड (Laura Wolvaardt) हिला रेणुका सिंग ठाकूरनं क्लीन बोल्ड केले. पाचव्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर रेणुकानं RCB च्या वाटेतील मोठा काटा दूर केल्याचा सीन पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेची स्टार बॅटर लॉरा वॉल्व्हार्ड ही मोठी खेळी खेळण्यात माहिर आहे. पण तिला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. रेणुकानं संघाला पहिलं यश मिळवून दिल्यावर अवघ्या ४१ धावांवर कनिका आहुजानं हेमलथाच्या रुपात गुजरातच्या संघाला दुसरा धक्का दिलाा. ती ९ चेंडूचा सामना करुन ४ धावांवर माघारी फिरली.
बेथ मूनीस-ॲशली गार्डनर या दोघींनी सावरला डाव
पहिल्या दोन विकेट झटपड पडल्यावर संघ अडचणीत सापडला असताना सलामीची बॅटर बेथ मूनी (Beth Mooney)आणि गुजरात संघाची कर्णधार ॲशली गार्डनर (Ashleigh Gardner) ही जोडी जमली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची खेळी केली. बेथ मूनीनं ४२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. याशिवाय गार्डनरनही अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.