Gautam Gambhir KL Rahul Team India, IND vs ENG 2nd ODI : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धची दुसरी वनडे जिंकून मालिकेत २-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने झंझावाती शतक ठोकले. त्याच्या शतकाच्या जोरावरच भारताने त्रिशतकी आव्हान सहज गाठले. रोहित फॉर्मात परतला असला तरी केएल राहुलचा फॉर्म हा अद्यापही टीम इंडियासाठी चर्चेचा विषय आहे. पहिल्या वनडेमध्ये केएल राहुलने अवघ्या २ धावा केल्या. तर दुसऱ्या वनडेमध्ये त्याला केवळ १० धावा करता आल्या. नागपूर आणि कटकमध्ये अपयशी ठरल्यानंतर चाहते केएल राहुलवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू के श्रीकांत याने थेट गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. गौतम गंभीर राहुलचं करियर उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
गंभीरचं नाव घेऊन जळजळीत टीका
"राहुलच्या बाबतीत जे घडतंय ते पाहून मला खूप वाईट वाटतंय. अक्षर पटेल उत्तम फलंदाजी करतोय यात वाद नाही. पण केएल राहुलसोबत जे केलं जातंय ते योग्य नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत. अनेक बडे दिग्गज करू शकणार नाहीत असे पराक्रम त्याने केले आहेत. संघ व्यवस्थापनाला नेमकं काय हवंय तेच कळत नाही. त्याला उगाच सहाव्या क्रमांकावर ढकलून ते काय साध्य करू पाहत आहेत. कारण त्या क्रमांकावर तो केवळ ६-७ धावाच करू शकतोय. गौतम गंभीर केएल राहुलबरोबर जे वागतोय ते खूप चुकीचं आहे," असा थेट आरोप श्रीकांत यांनी आपल्या यूट्युब चॅनेलवर बोलताना केला.
![]()
"आता हे प्रयोग फायदेशीर वाटतायत, पण नंतर..."
"गौतम गंभीरचे जे प्रयोग सुरु आहेत ते अतिशय अयोग्य आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी एक मोठी स्पर्धा काही दिवसात सुरु होणार आहे. त्याआधी राहुलबरोबर असं करण्याने काय साध्य होणार आहे. टॉप-४ मध्ये संघाला डाव्या-उजव्या फलंदाजांच्या कॉम्बिनेशनची गरज नसते. त्यानंतर खालच्या फळीत ही गरज असते. अशा वेळी ६व्या नंबरवर खेळवून राहुलसारख्या खेळाडूच्या करियरची वाट का लावताय? त्यापेक्षा राहुलला संघातून काढून टाका आणि रिषभ पंतला खेळवा. जर तुम्हाला राहुलला खेळवायचं असेल तर पाचव्या क्रमांकावर खेळवा. कुठलेही प्रयोग करू नका. गौतम गंभीरची पूर्ण प्रक्रियाच सदोष आहे. सध्याच्या घडीला कदाचित हा पर्याय फायदेशीर ठरेल पण दीर्घकाळासाठी हे फायद्याचे नाही," अशा शब्दांत श्रीकांत यांनी केएल राहुलची पाठराखण केली.
Web Title: Gautam Gambhir unfair with KL Rahul he wasting his career at number 6 batting said former Indian cricketer K Srikkanth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.