आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळताना भारतीय संघानं इतिहास रचला. कडवी टक्कर देण्यास सक्षम असलेल्या न्यूझीलंड संघाला पराभूत करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारतीय संघाचा हा विजय कॅप्टन रोहित शर्माच्या निवृत्तीवर टपून बसलेल्यांसाठी चपराक मारणारा होता. जेतेपदानंतर रोहित शर्मानंही माझ्या निवृत्तीच्या अफवा पसरवू नका, म्हणत सातत्याने चर्चेत मुद्दा निर्थक ठरवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितप्रमाणेच कोच गंभीरसाठी महत्त्वाची होती ही स्पर्धा, कारण...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित प्रमाणेच कोच गौतम गंभीरसाठीही महत्त्वाची होती. कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका वाईटरित्या गमावली. टीम इंडियावर घरच्या मैदानावर व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. यात भर पडली ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पराभवाची. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची सलग तिसरी फायनल खेळण्याची संधी हुकली. कॅप्टनसोबत मग कोच गंभीरच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जाऊ लागले. ड्रेसिंग रुममधील वाद या गोष्टी चर्चेत आल्या. संघ या धक्क्यातून सावरणार कसा? त्यासाठी संघाची रणनिती काय असली पाहिजे? यापेक्षा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधल्या गोष्टी कोण लिक करतंय? या गोष्टीची मोकाट चर्चा रंगली. त्याचं केंद्रस्थान ठरला तो गंभीर. हे सगळं सुरु होण्यामागचं कारण होतं ते टीम इंडियाची पराभवाची मालिका. टीम इंडिया खंबीर कामगिरी करून दाखवत नाही तोपर्यंत गंभीरच काही खरं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
गंभीर 'कोटा सिस्टीम'चा मुद्दाही गाजला
एका बाजूला भारतीय संघाच्या खराब कामगिरीशिवाय टीम इंडियात वर्णी लागलेल्या काही चेहऱ्यांमुळेही गौतम गंभीरवर निशाणा साधण्यात आला. गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणारा हर्षित राणासह वरुण चक्रवर्तीसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले. दोघांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संधी मिळाली. या खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री झाल्यावर काही मंडळींनी गंभीर हा कोटा सिस्टिममधून केकेआरच्या खेळाडूंना खेळवताना दिसतोय, असे बोलले गेले. पण त्याने हेरलेल्या गड्यांनी मैदान गाजवलं अन् आता गंभीरनंही दुबईच्या मैदानात फायनल मारल्यावर हे सगळे बोलणाऱ्या मंडळींना शेर शायरीतून सुनावलंय.
'फन कुचलने का हुनर सीखें जनाब'...
भारतीय संघानं मॅच जिंकल्यावर दुबईच्या मैदानात खेळाडूंच्यात कमालीचा उत्साह दिसून आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात नावाप्रमाणे चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन ड्रेसिंग रुममध्ये बसणाऱ्या गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर अखेर हास्य पाहायला मिळाले. फायनल बाजी मारल्यावर गंभीरनं नवज्योतसिंग सिद्धूशी संवाद साधला. यावेळी गंभीर शेर शायरीच्या मूडमध्ये दिसला. त्याने एक शेरही हाणला. "फन कुचलने का हुनर सीखें जनाब।...एवढं बोलून तो थांबला अन् मग सिद्धूनं हा शेर पूर्ण करत ‘सांपो के डर से जंगल नहीं छोड़े जाते..हा सूर ओढला. हा शेर गंभीरच्या मनातील भावना व्यक्त करणार असाच वाटतो. गेल्या काही दिवसांत टीम इंडियासंदर्भात जे घडलं अन् गंभीरबद्दल जे जे काही वाईट बोलले गेले त्यांना गंभीरनं शेर शायरीच्या मूडमध्ये येत टोला हाणल्याचे दिसून आले.