R Ashwin Gautam Gambhir, Champions Trophy 2025 India Squad : बीसीसीआयने (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची १९ जानेवारीला घोषणा केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात बीसीसीआय कार्यालयात जवळपास दोन ते तीन तास प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा रिपोर्ट येताच टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचीही एन्ट्री झाली, पण मोहम्मद सिराज, संजू सॅमसन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. असे असताना कोच गौतम गंभीरबाबत भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने एक मोठे विधान केले आहे.
"सध्याच्या काळात भारतीय संघात उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन असणे गरजेचे आहे. सध्या सर्वच संघात डावखुरे फिरकीपटू बरेच आहेत, पण ऑफ स्पिनर्स सध्या काहीसे कमी आहेत. अशा परिस्थितीत स्ट्राइक रोटेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर हा आठव्या क्रमांकासाठी भारतीय संघात नक्कीच खेळेल असं मला वाटतं. यामागे दोन कारणे आहेत. मला जितकं माहिती आहे, त्यावरून तरी गौतम गंभीरला तो खेळाडू खूपच आवडतो. तो त्याला खूप महत्त्वाचा खेळाडू मानतो आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. त्याबरोबरच आठव्या क्रमांकावर जर वॉशिंग्टन सुंदर सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाज खेळायला आला, तर संघाचा समतोल आपोआपच खूप चांगला राहतो," असे मत अश्विनने मांडले.
संघात शुबमन गिल उपकर्णधार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल. शुबमन गिल याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयावरून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील दरी सतत वाढत असल्याचाही चर्चा आहेत. गौतम गंभीर गिलला उपकर्णधार बनवण्याच्या विरोधात होते. पण रोहित ठाम राहिला आणि त्याला निवडकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला, असे म्हटले जाते. निवड समितीच्या बैठकीत गौतम गंभीर अष्टपैलू हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्याच्या बाजूने होते. परंतु रोहित शर्माने पांड्याला विरोध केला. मुख्य निवडकर्ता अजित आगरकरही पांड्याला उपकर्णधारपद देण्याच्या विरोधात होता, अशा चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षेर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा