India vs Pakistan, Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ज्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. अ गटात २३ फेब्रुवारीला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. पण भारत आपले सर्व सामने दुबईच्या स्टेडियममध्ये खेळणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामना असेल तर त्यासाठी दोन्ही देशांचे क्रिकेटचाहते प्रचंड उत्साही असतात. केवळ चाहतेच नव्हे तर खेळाडू आणि कोचिंग स्टाफमध्ये वेगळाच उत्साह असतो. याचदरम्यान, भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने या सामन्याबद्दल एक विधान केले आहे.
"आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरताना केवळ २३ तारखेचा सामना महत्त्वाचा असं ठरवून खेळणार नाही. आमच्यासाठी या स्पर्धेतील सर्वच्या सर्व सामने महत्त्वाचे असतील. आमच्यासाठी दुबईला जाऊन सर्व सामने जिंकणे हेच ध्येय असणार आहे. पण जर केवळ भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याबद्दल विचार करायचा असेल तर आम्ही त्या सामन्याचा अतिशय गंभीरपणे विचार करू. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हे दोन संघ खेळतात तेव्हा ऊर्जा सर्वाधिक असते. पण मला विचाराल तर माझ्यासाठी हा एक निव्वळ सामना असेल," असे गंभीर BCCI पुरस्कारांबद्दल बोलताना म्हणाला.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सामन्याबाबत म्हणाला...
"हल्ली भारत-पाकिस्तान सामन्यात मी जे पाहतो त्याने मला आश्चर्य वाटते. भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी क्रीजवर येतात आणि पाकिस्तानी खेळाडू त्यांच्याशी छान गप्पा मारत असतात, त्यांच्या बॅट हातात घेऊन पाहत बसतात, त्यांच्या पाठीवर थाप मारतात. आजकालच्या पाकिस्तानी खेळाडूंचं मैदानावर असं वागणं मला अजिबात पटत नाही. तुम्ही असं वागलं की भारताच्या खेळाडूंना वाटतं की तुम्ही कमकुवत झालात. आणि याचा तुमच्या आत्मविश्वासावरही परिणाम होते," असा सल्ला पाकिस्तानी माजी कर्णधार-यष्टीरक्षक मोईन खान याने दिला.