Gautam Gambhir Team India Dressing Room Controversy, Aus vs Ind 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून (३ जानेवारी) सिडनी येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकाव लागणार आहेच, पण त्यासोबत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रूमच्या वादावर वक्तव्य केले आहे. प्रशिक्षक आणि खेळाडूंमधला वाद हा ड्रेसिंग रूममध्येच राहिला पाहिजे, असे तो गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाला. जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत, तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असेल, असेही गंभीरने सांगितले.
ड्रेसिंग रूमचा वाद काय?
ड्रेसिंग रूमच्या वादाबद्दल बोलताना बुधवारी एका इंग्रजी वेबसाइटने खुलासा केला की, टीम इंडियामध्ये सर्व काही ठीक चालले नाही. मेलबर्नमधील पराभवानंतर गौतम गंभीर खेळाडूंवर भडकला होता. वरिष्ठ खेळाडूंवरही त्याने टीका केली होती. रिपोर्टनुसार, गंभीर म्हणाला होता की, आता खूप झालं. मी सांगेन त्याप्रमाणे खेळावे लागेल.
काय म्हणाला गंभीर?
पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला की, प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील ड्रेसिंग रुममधील चर्चा ही तेवढ्यापुरतीच मर्यादित असावी. जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत, तोपर्यंत गोष्टी सकारात्मक राहतील. भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात राहिल. फक्त एकच गोष्ट तुम्हाला संघात स्थान मिळवून देऊ शकते आणि ती म्हणजे तुमची मैदानावरील कामगिरी. सांघिक भावना प्रथम आणि सर्वात महत्वाची आहे. खेळाडू त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू शकतात, परंतु सांघिक खेळांमध्ये वैयक्तिक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते.
दुखापतग्रस्त आकाशदीप संघाबाहेर
एका प्रश्नाच्या उत्तरात गौतम गंभीर म्हणाला की, वेगवान गोलंदाज आकाशदीप पाचव्या कसोटीत खेळू शकणार नाही. पाठीच्या समस्येमुळे आकाश संघाबाहेर आहे. बॉर्डर-गावसकर करंडक कायम राखण्यात आम्ही यशस्वी होऊ, अशी मला आशा आहे. या मालिकेत आम्ही कसे खेळलो यावरही नक्की चर्चा व्हायला हवी.