डावखुरा जलदगती गोलंदाज ही भारतीय फलंदाजांसाठी कमकुवत बाब असताना काल डावखुऱ्या फिरकीपटूने नवं आव्हान उभं केलं. आशिया चषक २०२३ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या २० वर्षीय फिरकीपटूने ५ विकेट्स घेत भारताला अडचणीत आणले. दुनिथ वेल्लालागेने भारताची आघाडीची फळी खिळखिळीत केली. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, लोकेश राहुल व हार्दिक पांड्या या ५ महत्त्वाच्या विकेट्स वेल्लालागेने घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर २० वर्षीय फिरकिपटूने दिलेला दणका भारतीय संघाची झोप उडवणारा आहे. यावरून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) भारतीय फलंदाजांचे कान टोचले आहेत.
कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांसमोरील वाढत्या आव्हानावर प्रकाश टाकला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचे १० फलंदाज फिरकीवर माघारी परतले आणि भारताविरुद्ध प्रथमच असे घडले.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरने यावेळी वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात अॅडम झम्पा आणि अॅश्टन एगर यांच्या विरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजांची अशीच अवस्था झाली होती, याची आठवण करून दिली. २७० धावांचा पाठलाग करताना भारताला २१ धावा कमी पडल्या होत्या. झम्पा आणि एगर यांनी ६ विकेट्स घेतल्या होत्या.मंगळवारी बाद होण्याचे स्पष्टीकरण देताना गंभीरने पाच पैकी तीन बाद कसे घडले याकडे लक्ष वेधले.

"हा एक पॅटर्न बनत चालला आहे. तुम्हाला आठवत असेल तो चेन्नईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना, जेव्हा चेंडू थोडा वळत होता आणि भारताने अॅडम झम्पा आणि अॅश्टन एगर यांसारख्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते. जेव्हा चेंडू फिरकी घेतो त्यासमोर आम्ही संघर्ष करतो आणि आम्ही सामना खोलवर नेऊ शकतो की नाही हे देखील आम्हाला माहित नाही. विराट कोहली आणि लोकेश राहुल सॉफ्ट आऊट झाले, पण बाकीच्यांनी फुटवर्कमध्ये मार खाल्ला. रोहित शर्माला वेगवान चेंडूवर बाद झाला, गिलला बाद करणारा चेंडू शानदार होता. तुम्हाला भारतीय फलंदाजांकडून चांगल्या अपेक्षा आहेत,” असे गंभीर म्हणाला.

१२व्या षटकात वेल्लालागेला गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिल्या तीन षटकांत शुबमन गिल, रोहित शर्मा व विराट कोहली यांना बाद केले. "फलंदाज म्हणून आपण अनेकदा अँगलमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो, पण जर चेंडू तिथून फिरला तर गोष्टी कठीण होतात. फ्रंटफूटपेक्षा बॅकफूटवर खेळणे आवश्यक आहे. हार्दिक कसा बाद झाला बघा. तुम्ही मेंडिसचा उल्लेख केला... त्याच्याकडे कॅरम बॉल होता आणि आम्ही तो खेळलाही नाही," असे त्याने स्पष्ट केले.