Join us  

संजू सॅमसनने शतक झळकावले, पण...! गौतम गंभीरने व्यक्त केली चिंता, त्याचे संघातील स्थान.... 

पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीला एक प्रकारे 'पुन्हा सुरुवात' केली, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 4:23 PM

Open in App

IND vs SA, Sanju Samson Century   (Marathi News) : पार्ल येथे गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या वन डे सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीला एक प्रकारे 'पुन्हा सुरुवात' केली, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हटले आहे. सॅमसनने ११४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली आणि ती मॅच विनींक खेळी ठरली. भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करून मालिका २-१ ने जिंकली. पण, अन्य कोणत्याही देशात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूला एक शतक पुरेसे असते, परंतु भारताकडे अनेक पर्याय असताना पुढच्या वन डे मालिकेत संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याची गंभीरला खात्री वाटत नाही.  

२०१५ मध्ये भारतात पदार्पण करणाऱ्या २९ वर्षीय सॅमसनला भारतीय संघात कायम राहण्यासाठी मोठी खेळी करत राहणे गरजेचे आहे, अन्यथा २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संधी मिळणार नाही. गंभीरच्या मते पुढच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अजून चार वर्षे बाकी असताना भारताच्या संक्रमणानंतरच्या टप्प्यात सॅमसन एक उत्कृष्ट फलंदाज-विकेटकीपर पर्याय असू शकतो.

"त्याच्याकडे किती टॅलेंट आहे हे सर्वांना माहित आहे. आयपीएलमध्ये त्याने ज्या प्रकारची खेळी खेळली आहे, त्याची सर्वांनी चर्चा केली आहे. पण शतकी खेळीतून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला किकस्टार्ट केले आहे. याआधी त्याला नेहमीच थोड्याच संधी मिळाल्या. कधीकधी त्याला एक सामना खेळवले, तर कधी तो डावलला जाईल. पण, जेव्हा तुम्ही १०० धावा करता तेव्हा तुम्ही निवडकर्त्यांना केवळ प्रभावित करत नाही तर तुम्हाला निवडण्यासाठी त्यांच्यावर दबावही टाकता," असे गंभीर म्हणाला.

"पण या शतकानंतरही भारत त्याच्यासोबत टिकून राहील की नाही हे पाहावे लागेल, कारण पुढचा वर्ल्ड कप चार वर्षे दूर आहे. तरीही सॅमसन ज्या दर्जाचा खेळाडू आहे, त्याला कायम ठेवला पाहिजे, असे मला वाटते. तुमच्याकडे मधल्या फळीत खूप चांगला पर्याय आहे. भारताकडे नेहमीच मजबूत आणि भारी टॉप ऑर्डर असेल पण सॅमसन तुम्हाला नेहमी मधल्या फळीत योग्य पर्याय देईल. या खेळीसह सॅमसनने त्याच्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली आहे," असे गंभीर म्हणाला.  

टॅग्स :संजू सॅमसनभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागौतम गंभीर