नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्यातुलनेत गांगुलीला अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होऊ शकते.
अरुण हे केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. त्याचवेळी आसामच्या देबाजीत सैकिया यांची संयुक्त सचिवपदी निवड होण्याचीही शक्यता आहे. यामुळे बीसीसीआयमध्ये पूर्वेकडील क्रिकेट संघटनेच्या प्रतिनिधीला पद
मिळणे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यात दखल घेण्याची बाब म्हणजे बीसीसीआयच्या प्रमुख पदावरील सर्व उमेदवारांच्या विरोधात अद्याप कोणीही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता बळावली आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली आणि ब्रिजेश पटेल यांच्यामध्ये कडवी लढत होण्याची शक्यता होती. सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर तो या पदावर २०२० पर्यंत कार्यरत राहील. (वृत्तसंस्था)