Join us  

खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट

संचारबंदी या कालावधीत सगळे घरीच राहणे पसंत करत असलेतरी जे निराधार आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 2:55 PM

Open in App

- शरद जाधव 

सांगली : कोरोना विषाणूची दहशत आणि त्यावरील उपाययोजनांसाठी सध्या संचारबंदी लागू आहे. या कालावधीत सगळे घरीच राहणे पसंत करत असलेतरी जे निराधार आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत. अशाच चार दिवसांपासून उपाशी असलेल्या फिरस्त्याला स्वत:चा डबा खावू घालणार्‍या सांगली पोलीस दलातील येळावी (ता.तासगाव) येथील पोलीस कर्मचार्‍याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. स्टार क्रीकेटपटू युवराज सिंगने देखील या व्हिडीओची दखल घेत पोलीस कर्मचार्‍याच्या या कार्याला कडक सॅल्युट ठोकला आहे.संचारबंदीमुळे गोरगरीबांचे खूप हाल होत आहेत. तरीही या निराधारांच्या सोयीसाठी प्रशासनाने निवारा केंद्र सुरू केली आहे. या केंद्राचीही माहिती नसलेले अनेकजण भर उन्हात भटकंती करत आहेत. 

तासगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या येळावी दुरक्षेत्राचे बीट अंमलदार संजय माने हे संचारबंदीमुळे आपले सहकारी गृहरक्षक दलाचे जवान सलमान  फकीर व राहूल जाधव यांच्यासोबत येळावी ते पाचवामैल रोडवर गस्तीवर होते. यावेळी रस्त्यावरून भर उन्हात एकजण जात असल्याचे त्यांना दिसला. माने यांनी त्यास थांबवित बाजूला येण्यास सांगितले. त्या फिरस्त्याला मराठी येत नव्हते त्यामुळे हिंदीतून त्यांचा संवाद सुरू झाला. 

गेल्या चार दिवसांपासून आपण जेवण केले नसल्याचे त्याने सांगताच खाकी वर्दीतला हा माणूस गहीवरल. त्याने तात्काळ दुचाकीला लावलेला स्वत:चा जेवणाचा डबा त्यास देत जेवण करण्यास सांगितले. याचवेळी फिरस्त्याला पोलिसांकडून मारहाणीची शक्यता धरून काही तरूण याचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी माने यांनी शुटींगसाठी दिखाव्यासाठी मी करत नाही असे सांगत भुकेल्या जीवाला मदत करत असल्याचे सांगत आपल्यातील माणूसकी दाखवून दिली. 

या घटनेनंतर माने ही हे सगळे विसरले असताना, क्रीकेटपटू युवराजसिंगने फिरस्त्याला जेवण देत असलेल्या हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ही हदयस्पर्शी व्हिडीओ असून पोलिसातील माणूसकी यातून दिसून येते. फिरस्त्याला आपुलकीने आपला डबा खावू घालणारा माणूसकी असलेला पोलीस असेही त्याने लिहले आहे. तब्बल १६ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून पोलिसाच्य कामाचे कौतुक केले आहे. 

व्हिडीओ व्हायरलमुळे मानेही भारावले

याबाबत संजय माने म्हणाले, अत्यंत उत्स्फूर्तपणे असे घडले. त्या फिरस्त्याने थांबविल्यानंतर लगेचच चार दिवसांपासून जेवलो नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्वत:चा डबा दिला. पाणी दिले. त्यानंतर हे मी विसरूनही गेलो होतो मात्र, ध्यानीमनी नसताना थेट युवराजसिंगने व्हिडीओ पोस्ट केला याचा आनंद आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिसयुवराज सिंगसांगली