Join us

Aus vs Ind: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार; रेड्डी-सुंदर जोडीने केला विश्वविक्रम

Nitish Kumar Reddy Washington Sundar World Record in Test Cricket: नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने दमदार शतकी भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:00 IST

Open in App

Nitish Kumar Reddy Washington Sundar World Record in Test Cricket: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने तळाच्या फलंदाजीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले. स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने २२१ धावांवर सात बळी गमावले होते. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने अप्रतिम खेळ करत भारतीय संघाला साडेतीनशे पार मजल मारून दिली. नितीश रेड्डीने (१०५) नाबाद शतक ठोकले. तर वॉशिंग्टन सुंदरनेही (५०) अर्धशतकी खेळी केली. या जोडीने ऑस्ट्रेलियात दमदार फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १४७ वर्षात न घडलेला पराक्रम करत विश्वविक्रम रचला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना नीट अभ्यास केला होता. त्यामुळे वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाने प्लॅन तयार केला होता. त्या प्लॅनच्यानुसार, भारतीय फलंदाज झटपट बाद झाले. यशस्वी जैस्वाल (८२) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यानंतर आठव्या आणि नवव्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर खेळायला आले. तेथूनच सामना फिरला. या दोघांनी १२७ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने १६२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर नितीश कुमार रेड्डी १७६ चेंडूत १०५ धावांवर नाबाद खेळत आहे. खरा पराक्रम म्हणजे या दोघांनीही प्रत्येकी १५० पेक्षा जास्त चेंडू खेळले. फलंदाजीतील आठव्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी प्रत्येकी १५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही कसोटी क्रिकेटमधील पहिलीच वेळ ठरली.

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारतीय फलंदाजांनी घोर निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. केएल राहुल (२४) आणि विराट कोहली (३६) या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठ्या खेळी करण्यात अपयश आले. रिषभ पंत (२८) बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला. रविंद्र जाडेजादेखील १७ धावांत माघारी परतला. पण रेड्डी आणि सुंदर या जोडीने भारताचा डाव सावरला. वॉशिंग्टन सुंदरने ५० धावांची खेळी केली. बुमराह आणि आकाश दीप शून्यावर बाद झाले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सिराज २ धावांवर नाबाद राहिला. तर नितीश कुमार रेड्डी १०५ धावांवर नाबाद आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या टॉप ४ फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास (६०), उस्मान ख्वाजा (५७) आणि मार्नस लाबूशेन (७२) यांनी अर्धशतके ठोकली. तर स्टीव्ह स्मिथने १४० धावांची दमदार शतकी खेळी केली. स्मिथच्या खेळीत १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तळाच्या फलंदाजांनीही भारताला चांगलेच झुंजवले. अलेक्स कॅरीने ३१, पॅट कमिन्सने ४९, मिचेल स्टार्कने १५, नॅथन लायनने १३ धावांची भर घातल संघाला साडे चारशेपार मजल मारून दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, रवींद्र जाडेजाने ३, आकाश दीपने २ तर वॉशिंग्टन सुंदरने १ बळी घेतला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावॉशिंग्टन सुंदरभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया