Jasprit Bumrah Started Practice Ahead Of IND vs AUS 3rd test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांची कसोटी मालिकेत रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. आता ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात कोण आघाडी घेणार यावर सर्वांच्या नजरा असतील. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या ताफ्यातील एक सीन असा पाहायला मिळाला जो टीम इंडिया संकटात असल्याचे चित्र निर्माण करणारा होता. कारण भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह प्रॅक्टिस सेशनपासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट स्टार खेळाडूच्या दुखापतीशी जोडली गेली. पण त्यात काहीच तथ्य नाही, ही गोष्ट आता समोर आली आहे.
पहिल्या सेशनला दांडी, त्यानंतर कंबर कसून सराव करताना दिसला बुमराह
पिंक बॉल टेस्टनंतर अन्य खेळाडूंसोबत तो प्रॅक्सिस सेशनला दिसला नव्हता. पण आता ब्रिस्बेन कसोटीसाठी त्यानेही कंबर कसली आहे. जसप्रीत बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात स्टार गोलंदाज ज्या पद्धतीने नियमित रनअपसह गोलंदाजी करतोय ते पाहता जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी एकदम फिट असल्याचे दिसून येते.
बुमराह फिट है बॉस! टीम इंडिया टेन्शन फ्री
अॅडिलेडच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतानामध्येच थांबला होता. त्यानंतर फिजिओची मैदानात झालेल्या एन्ट्रीचा सीन टीम इंडियासह तमाम क्रिकेट चाहत्यांची धकधक वाढवणारा होता. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहनं गोलंदाजी केली. पण तो नेहमीप्रमाणे गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यानं प्रॅक्टिस सेशनला मारलेल्या दांडीमुळे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात तो खेळणार की, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण तो नेट्स प्रॅक्टिससाठी मैदानात उतरताच टीम इंडिया टेन्शन फ्री असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग
जसप्रीत बुमराहचे जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यातील एका व्हिडिओमध्ये तो लेग ब्रेक अर्थात लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसून येते. त्यानंतर तो आपल्या शैलीतही गोलंदाजी करतानाही दिसून येते. ही गोष्ट तो पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार असल्याचे दाखवणारी आहे.