Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीन आफ्रिदीची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकापट्टी; शाहिद आफ्रिदी म्हणाला...

Shaheen Afridi News: पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 19:33 IST

Open in App

पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा बाबर आझमच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिकेत दिसणार आहे. शेजाऱ्यांचा संघ मायदेशात आगामी काळात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळेल. न्यूझीलंडनेपाकिस्तान दौऱ्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संघ ट्वेंटी-२० क्रिकेट खेळत आहेत. १८ एप्रिलपासून पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या आधी पाकिस्तानी संघ शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका खेळला होता. 

आगामी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा बाबर आझमच्या खांद्यावर सोपवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून सलामीचा सामना १८ एप्रिलला खेळवला जाईल. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे शेजाऱ्यांना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानने ट्वेंटी-२० मालिका खेळली. पण, आता शेजाऱ्यांचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वात असणार आहे. 

शाहीन आफ्रिदीला केवळ एका मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि शाहीनचा सासरा शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी नेहमीच शाहीनला कर्णधारपदापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला याने काहीही फरक पडत नाही. आफ्रिदी पाकिस्तानातील जिओ न्यूजवर बोलत होता.

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  1. १८ एप्रिल - रावळपिंडी
  2. २० एप्रिल - रावळपिंडी
  3. २१ एप्रिल - रावळपिंडी
  4. २५ एप्रिल - लाहोर 
  5. २७ एप्रिल - लाहोर 
टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटशाहिद अफ्रिदीबाबर आजम